सनी साळवे खून प्रकरणी चौघांना दुहेरी जन्मठेप
धुळे : प्रशांत उर्फ सनी प्रकाश साळवे खूनप्रकरणी न्यायालयाने चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा गुरुवारी ठोठावली. तर पुराव्याअभावी तीन संशयितांची निर्दोष मुक्तता केली. न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी हा निकाल सुनावला. निकाल देताच मयत सनी याचे आई-वडील भावूक झाले होते. बहुचर्चित असलेल्या प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते.
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? : धुळे शहरातील चंदननगरातील रहिवासी सनी साळवे व त्याचा मित्र सुमेध सूर्यवंशी यांच्यावर १८ एप्रिल २०१८ रोजी खूनी हल्ला करण्यात आला. मोटारसायकलचा कट लागला म्हणून जितू फुलपगारे याने साथीदारांसह अडवत त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी सनी साळवे याला चाकू, गुप्तीने भोसकल्याने तो दगावला. तर त्याचा मित्र व भाऊ हे देखील या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले. या घटनेनंतर देवपूर पोलिसांत जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवळे, दादा फुलपगारे, गोपाल चौधरी, भय्या बाविस्कर, सनी सानप यांच्यावर भादंवि कलम ३०२, ३०७, ३२३, १४१, १४७, १४८, १४९ सह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.
चार आरोपींना दुहेरी जन्मठेप : सनी साळवे खून खटला धुळे जिल्हा न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने सर्व साक्षी, महत्वाचे पुरावे तपासून गुरूवारी निकाल दिला. यामध्ये तत्कालीन डीवायएसपी सचिन हिरे यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच फिर्यादी सागर साळवे, प्रत्यक्ष साक्षीदार सुमेध सूर्यवंशी, सौरभ साळवे यांच्या साक्षी दिशादर्शक ठरल्या. त्यानुसार जिल्हा न्यायालय क्रमांक पाचचे न्यायाधीश डी. एम. आहेर यांनी या खटल्याचा निकाल सुनावला. यात मुख्य आरोपी जितू फुलपगारे, दीपक फुलपगारे, मयूर उर्फ गुड्ड्या फुलपगारे, वैभव गवळे यांना भादंवि कलम ३०२, ३०७, ३२३, १४७, १४८, १४९ व ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. या चौघांना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. शिवाय १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आणखी एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद केली. तर अन्य एक संशयित दादा फुलपगारे हा खून व खूनाचा प्रयत्न या कलमांतून निर्दोष सुटला. मात्र, त्याला इतर कलमान्वये शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे त्याला आणखी साडेतीन वर्ष कारावास भोगावा लागणार आहे. तसेच १० हजारांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा भोगावी लागेल.
या वकिलांनी घेतली विशेष मेहनत : सनी साळवे खटल्याकडे अवघ्या धुळे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. हा खटला जिंकण्यासाठी विशेष सरकारी वकील ॲड. शामकांत पाटील, ॲड. सी. डी. सोनार, ॲड. निलेश दुसाणे, ॲड. विशाल साळवे, ॲड. उमाकांत घोडराज आदी वकिल विशेष मेहनत घेत होते. वकिलांच्या एकत्रित मेहनतीमुळेच सनी साळवेला न्याय मिळाल्याची जनभावना दलित समाजातून उमटली आहे.
बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत मुकवाॅक : सनी साळवे खून खटल्यातील आरोपींना शिक्षा झाल्यानंतर सनीचे आई-वडिल, भाऊ, बहिण हे जिल्हा नायालयापासून शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ पोहोचले. त्यांनी महामानवाला अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानावर आमचा पुर्ण विश्वास असल्याची प्रतिक्रिया सनी साळवे यांच्या बहिणीने यावेळी दिली.