वीज, आरोग्य, घरकुलांसह विविध प्रश्नांना अधिवेशनात वाचा फोडली
धुळे : महाराष्ट्र सरकारच्या हिवाळी अधिवेशनात विविध आयुधांचा वापर करीत आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील वीजेचे प्रश्न, आरोग्य, घरकुलांसह जनतेचे विविध विकासाचे प्रश्न मांडले. जनतेचे प्रश्न थेट अधिवेशनात माडत जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आ. कुणाल पाटील यांनी केले. अधिवेशनात धुळे तालुक्यात शेती पंप आणि गावात नवीन ट्रान्स्फार्मर, आदिवासी वस्तीत विद्युत खांब बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. तर ग्रामीण भागातील विविध घटकांसाठी वाढीव घरकुले देण्याचीही मागणी अधिवेशनात केली आहे.
नागपूर येथे 7 ते 20 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनात आ. कुणाल पाटील यांनी लक्षवेधी, तारांकीत, अतांराकीत, कपात सूचना, पुरक मागण्या, पॉईंट ऑफ इम्फॉर्मेशन अशा कामाकाजातील विविध आयुधांचा वापर करीत धुळे तालुक्यासह जिल्हयातील प्रश्न प्रभावीपणे मांडले. कपात सूचना क्र. 6207 नुसार आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील शेती पंप आणि ग्रामीण भागातील विविध गावांमधील विजेच्या संदर्भात विविध समस्या उपस्थित केल्या, त्यात कृषी पंपाना तत्काळ विज कनेक्शन देणे, शेतकर्यांसाठी सिंगल फेज ट्रान्सफार्मर बसविणे, आदिवासी वस्त्यांसह नवीन वसाहतींमध्ये इलेक्ट्रीक पोल बसविणे, प्रलंबित कामांना गती देणे, गावात तसेच शेतांमध्ये लोंबकळणार्या जीर्ण विद्युत तारा बदलणे, ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेसाठी नवीन ट्रान्स्फार्मर बसविणे अशा प्रश्नांची तातडीने सोडवणूक करुन उर्जाविषयक समस्या मार्गी लावण्यासाठी जास्तीचा निधी शासनाने मंजुर करुन द्यावा अशी मागणी केली.
धुळे जिल्हयात घरकुलांअभावी असंख्य कुटूंब बेघर आहेत. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत वाढीव घरकुलांना मंजुरी देण्यात यावी अशीही मागणी आ. कुणाल पाटील यांनी अतारांकीत प्रश्नातून केली आहे. तसेच धुळे तालुक्यातील आणि जिल्हयातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र साहित्य आणि कर्मचार्यांअभावी बंद अवस्थेत आहे, परिणामी जनतेचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तत्काळ आरोग्य कर्मचार्यांची नियुक्ती करुन आवश्यक ते सर्व साहित्य पुरवठा करण्यात यावा अशीही मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली आहे.
राज्यातील तब्बल 50 हजार होमगार्ड कर्मचार्यांच्या मागण्या प्रलंबित असून नियमित काम नसल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुर्हाड कोसळली आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून होमगार्ड कर्मचार्यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात असेही आ. पाटील यांनी सांगितले आहे. धुळे तालुक्यातील आर्णी ते फागणे, उभंड ते पिंपरखेड यांच्यासह विविध रस्ते नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे सदर रस्ते नवीन करणेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचीही मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली आहे. आ. कुणाल पाटील यांनी विविध प्रश्न उपस्थित केल्याने सर्वसामान्य जनता व कर्मचार्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. तर विकास कामांसाठी निधीची मागणी केल्याने त्यातुन विकासालाही गती मिळेल.