दिव्यांग बांधवांसाठी ‘मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल’
धुळे : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ,मुंबई यांच्यामार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल ) मोफत उपलब्ध करुन देण्याची योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 4 जानेवारी, 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, धुळे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती शोभा कराड यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक,सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांचा कुटूंबासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांच्यास्तरावरुन करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग अर्जदारांस https://mshfdc.co.in/ या संकेतस्थळावर evehicleform.mshfdc.co.in गुरुवार दि.4 जानेवारी, 2024 पर्यंत सकाळी 10 वाजेपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती. कराड यांनी केले आहे.