विमलनाथनगरजवळील बोगद्याच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास
धुळे : येथील रेल्वेस्थानकालगत विमलनाथ नगरजवळ नागरिकांना ये-जा करण्यासाठी रेल्वे बोगदा बांधून अंडरपास देण्यात आला होता. या रस्त्याला पुढे दोन्ही बाजूंना चढावर संरक्षक भिंत नसल्याने तो वाहनधारकांसाठी प्राणघातक ठरत होता. याबाबत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा लोकसभेच्या धुळे मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रेल्वेचे भुसावळ येथील विभागीय उपव्यवस्थापकांकडे पाठपुरावा करत या अंडरपास पुलाला संरक्षक भिंत बांधण्याची कार्यवाही पूर्ण करून घेतली. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
येथील रेल्वेस्टेशनजवळ विमलनाथ नगरलगत मिल परिसरासह डेअरी परिसर व केदार सिटी भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी बोगदा बांधण्यात आला आहे. हा बोगदा ओलांडल्यानंतर केदार सिटी व डेअरीकडे जाताना चढावर पुलाला संरक्षक भिंत नसल्याने हा रस्ता धोक्याचा ठरत होता. गेल्या महिन्यात याच रस्त्याने जाणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचा मोटारसायकल २० फूट पुलावरून कोसळल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यूही झाला होता. यामुळे या पुलाला दोन्ही बाजूला संरक्षक भिंतीची गरज व्यक्त होत होती. तशी मागणीही जोर धरत होती. याबाबत परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण अग्रवाल यांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या ही बाब निदर्शनास आणून देत संरक्षक भिंतीसाठी विनंती केली होती.
ही गंभीर बाब लक्षात घेत खासदार डॉ. भामरे यांनी रेल्वेचे भुसावळ येथील विभागीय उपव्यवस्थापकांकडे या धोकादायक बोगद्याच्या चढावावरील रस्त्याला संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी केली. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश येत या संरक्षक भिंतीचे काम नुकतेच पूर्णत्वास आले आहे. यामुळे डेअरी व केदार सिटीकडे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची मोठी सोय झाली असून, अपघातांचा धोका टळण्यास मदत होणार आहे. खासदार डॉ. भामरे यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम पूर्ण झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.