धुळ्यात मनुस्मृतीचे दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा
धुळे : ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या धुळे जिल्हा युनिटतर्फे मनुस्मृती आणि ईव्हीएम यंत्राच्या पोस्टरचे दहन करून भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला. धुळे शहरात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
आजच्या काळातील मनुस्मृती म्हणजेच ईव्हीएम मशीन आहे. त्यामुळे आज आम्ही ईव्हीएम मशीन आणि मनुस्मृती या दोन्हींचे दहन करीत आहोत, अशी भूमिका ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडली. यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर मोहिते, माया पानपाटील, सुनिता गोपाळ, अनिता सोनवणे, भाऊसाहेब बळसाणे, आनंद अमृतसागर, आकाश घोडे, गोरख अहिरे, निलेश इंदवे, अशोक करंजे, विशाल वाघ, मालती बागुल, हर्षल जाधव, रोहित वाघ, समाधान मंगळे, गोपाल शिरसाठ, आकाश कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ऑल इंडिया पॅंथर सेनेची भूमिका अशी : यावेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, 1. स्त्रीने मुलगी, पत्नी, आई, किंवा मुलगी, तरुण किंवा वृद्ध कोणत्याही स्वरूपात स्वतंत्र असू नये. (मनुस्मृती, अध्याय 9, श्लोक दोन ते सहा). 2. पती पत्नीला सोडू शकतो, तिला गहाण ठेवू शकतो, विकू शकतो. परंतु स्त्रीला असे अधिकार नाहीत. (मनुस्मृती, अध्याय 9, श्लोक 45). 3. स्त्रीला मालमत्तेचा अधिकार नाही. स्त्रीच्या मालमत्तेचा मालक तिचा पती, मुलगा किंवा वडील असतो. (मनुस्मृती, अध्याय 9, श्लोक 416). 4. ज्याप्रमाणे असत्य अपवित्र असते. त्याचप्रमाणे स्त्रीयादेखील अपवित्र असतात. स्त्रियांना वेद, मंत्र, उपनयन यांचा अभ्यास, अध्यापन, पठाण करण्याचा अधिकार नाही. (मनुस्मृती, अध्याय 2, श्लोक 66 आणि अध्याय 9, श्लोक 181). 5. नवरा जरी आचारविहीन असला, इतर स्त्रियांशी आसक्त असला, दुर्गुणांनी भरलेला, नपुंसक असला तरी स्त्रीने त्याची देवाप्रमाणे पूजा करावी. (मनुस्मृती, अध्याय 5, श्लोक 154).
मनुस्मृतीनुसार, त्याच गुन्ह्यासाठी गुन्हेगाराची जात आणि ज्याच्यासोबत गुन्हा केला आहे, त्याची जात लक्षात घेऊन शिक्षा दिली जावी. ईव्हीएम म्हणजे लोकशाहीला धोका असलेली मनुस्मृती आहे. कारण मनुस्मृती ही लोकशाहीला धोका होती. मागच्या काळात आणि या काळात ईव्हीएम हे लोकशाहीला धोका आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे सहकारी सहस्त्रबुद्धे यांच्या हातून विषमतावादी, जातीयवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी व्यवस्थेला धरून चालणाऱ्या मनुस्मृतीचे 25 डिसेंबर १९२७ साली रायगडच्या पायथ्याशी महाड येथे दहन केले आणि बहुजनांना जातीयवादी समाजरचनेतून मुक्त केले.
25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे मनुस्मृतीचे दहन करून या भारत देशाला व भारत देशातील महिलांना जगण्याचा अधिकार दिला. माणसांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करून महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणून दरवर्षी मनुस्मृतीचे दहन केले जाते. म्हणून आज ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने धुळ्यात मनुस्मृती नामक अत्याचारी, वैदिक, हुकूमशाही ग्रंथ म्हणजे मनुस्मृतीचे दहन करून स्त्री मुक्ती दिन साजरा करण्यात आला.