अक्कलपाडा प्रकल्पामुळे धुळेकरांना पाणी! पण हा प्रकल्प कोणी केला? Video Viral
धुळे : अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेमुळे धुळे शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाल्याचा दावा भाजपने केला आहे. या योजनेचे आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. तत्पूर्वी यासंदर्भात खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने तयार केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला आणि लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहनही केले.
दरम्यान, आमदार कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाने तयार केलेला व्हिडिओ देखील मंगळवारी धुळे शहरासह धुळे ग्रामीण आणि संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे. “धुळे शहराचा पाणीप्रश्न अक्कलपाडा प्रकल्पामुळे सुटला! पण अक्कलपाडा प्रकल्प कोणी उभारला?”, असा महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये आहे. विशेष म्हणजे धुळे ग्रामीणमधील शेतकरीच नव्हे तर धुळे शहरातील नागरिक आणि महिलांनी देखील अक्कलपाडा प्रकल्पासह पाणीपुरवठा योजनेचे श्रेय माजी मंत्री रोहिदास पाटील यांना दिल्याच्या प्रतिक्रिया या व्हिडिओमध्ये आहेत.
खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाने सोशल मीडियावर केलेले आवाहन
धुळेकर नागरीकांसाठी महत्वकांक्षी पिण्याच्या पाण्याची योजना प्रत्यक्ष कार्यान्वित… अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा उद्या होत आहे. हा क्षण समस्त धुळेकर नागरिकांसाठी आनंदाचा असणार आहे. दररोज नाही पण किमान एक दिवसाआड पिण्याचे पाणी भेटावे ही प्रांजळ ईच्छा धुळेकरांची अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुर्ण होत आहे. आठ ते पंधरा दिवस पिण्याच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या माता-भगिनींचे होणारे हाल संपुष्टात येणार आहेत. कारण आता एक दिवसाआड पाणी येणार. 16 फेब्रुवारी 2019 ला 70 कोटी रूपये निधीसह अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना मंजुर करून आणण्यात खासदार डाॅ. सुभाष भामरे यांना यश आले. प्रत्यक्ष कामाची सुरूवात झाली. अनेक संकटांवर मात करत ही योजना आता पुर्णत्वास आली आहे. उद्या (तारीख 27) या योजनेचे लोकार्पण आहे. समस्त धुळेकर नागरिकांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. सर्व नागरिकांनी लोकार्पण सोहळ्याला यावे हि नम्र विनंती.
दरम्यान, माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी अक्कलपाडा प्रकल्प केला नसता तर धुळे शहराचा पाणीप्रश्न सुटला असता का?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात आमदार कुणाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाने तयार केलेला व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. (टिप : दोन्ही व्हिडिओ जसेच्या तसे वरती पाहू शकता…)
Comments 1