भाजपच्या नेत्यांना फुकटाचं श्रेय घेण्याची सवय, आमदार फारुख शाह यांची टीका
धुळे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विकासकामांचे फुकटचे श्रेय लाटण्याची सवय झाली आहे, अशी बोचरी टीका धुळे शहराचे आमदार डॉ. फारुख शाह यांनी केली. शहरात एका रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे लोकार्पण बुधवारी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयासाठी भाजपने भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने रूग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, असा उल्लेख पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात केला होता.
यावर बोलताना आमदार फारुख शाह म्हणाले, धुळे शहरातील जिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे यासाठी मी मंत्रालय स्तरावर सतत पाठपुरावा केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने निधी उपलब्ध करून दिला होता. आता जिल्हा रूग्णालयातील कामे पुर्ण झाल्याने भाजपचे नेते लोकार्पण करीत आहेत. फुकटाचं श्रेय लाटण्याची त्यांना सवयच झाली आहे, अशी टीका आमदार शाह यांनी केली.
हेही वाचा
अक्कलपाडा प्रकल्प भाजपनेच पूर्ण केला! पालकमंत्री गिरीश महाजन यांचा दावा
संत नरहरीनगरात रस्ते कामाचा शुभारंभ
महाराष्ट्र राज्य नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक ११ संत नरहरी कॉलनी, माणिकनगरमध्ये रस्ते डांबरीकरण व गटार करणे कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते शमसुल हसन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेवक गनी डॉलर, डॉ. सरफराज अन्सारी, माजी नगरसेवक साजिद साई, डॉ. दीपश्री नाईक, निजाम सय्यद, शकीला शेख, मलिका खाटीक, परवीन शेख, इकबाल शाह, शोएब मुल्ला, रफिक पठाण, आसिफ शाह, नजर खान, सुफी कुरेशी, डॉ.बापुराव पवार, सउद आलम, फैसल अन्सारी, साहिर पटेल, नुर शाह, सुफियान अन्सारी, रमजान पाटील, सइद बाबा, नुसार शेख, गुलाम अन्सारी, आसिफ अन्सारी, इसाक पिंजारी, आरिफ पिंजारी, रइस सय्यद, जावेद पिंजारी, अन्वर पिंजारी, सरोज खाटीक आदी उपस्थित होते.