मोदी आवास योजनेत घोटाळा! विश्वनाथचा ग्रामसेवक करतो अरेरावी!!
धुळे : तालुक्यातील विश्वनाथ-सुकवड ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मोदी आवास योजनत (ओबीसी घरकुल) घोटाळा झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी थेट विभागीय आयुक्तांकडे केली.
सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमत करून ग्रामसभा न घेता परस्पर कागदावर ग्रामसभा घेऊन घरकुल योजनेचा तीन वेळा ठराव करून यादी तयार केली. घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे लक्षात आल्यावर पात्र लाभार्थी आणि ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना विचारणा करायला सुरुवात केली. परंतु ग्रामसेवकाने गावात आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयात येणेच बंद केले. महिनाभरापासून ग्रामस्थ जिल्हा परिषदेच्या खेटा मारत होते. पण तरीही उपयोग झाला नाही.
ग्रामसेवक भेटत नसल्याने आणि जिल्हा परिषदेतील अधिकारीही कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने ग्रामस्थांच्या एका शिष्टमंडळाने ग्रामसेवक राहत असलेल्या चितोड गावात जाऊन त्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामस्थ शुक्रवारी सकाळपासून चितोड गावात ग्रामसेवकाच्या घरी गेले. ग्रामसेवकाची गाडी दारासमोरच लावलेली होती. परंतु ग्रामसेवक त्यांना भेटण्यास बाहेर आलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी ग्रामसेवक घरी नसल्याचे सांगितले. तास दोन तास थांबूनही उपयोग झाला नाही. म्हणून कंटाळलेल्या ग्रामस्थांनी आपला मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळविला.
दरम्यान, जिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होती. ही संधी साधत ग्रामस्थांनी विभागीय आयुक्तांना बैठकीला जाण्याआधीच अडविले आणि त्यांना विश्वनाथ ग्रामपंचायतमधील भोंगळ कारभाराबाबतचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता देखील उपस्थित होते. या निवेदनावर त्वरित चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, मोदी आवास योजनेअंतर्गत लाभार्थी यादी तयार करण्यासाठी प्रत्यक्ष ग्रामसभा न घेता कागदावर ग्रामसभा घेऊन यादी तयार करण्यात आली. विशेष म्हणजे 5 नोव्हेंबर 2023 याच तारखेला तीन वेगवेगळे ठराव केले आणि तीन वेळा यादीतील नावे बदलण्यात आली. तसेच गेल्या चार ते पाच दिवसांपासून ग्रामपंचायतीचे संगणक चालक गावात घरकुलची यादीचे काम सांगून कागदपत्रे आणि प्रति व्यक्ती शंभर रुपये जमा करीत होते. याबाबत गणेश चिंधा पाटील यांनी विचारणा केली असता संगणक चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. गणेश पाटील यांनी लाभार्थ्यांची यादी दाखविण्याची विनंती केली. परंतु संगणक चालक यादी दाखवू शकले नाहीत. माझ्याकडे यादी नसल्याचे त्यांनी लेखी दिले आहे. यादी नसेल तर कोणत्या कामासाठी पैसे आणि कागदपत्रे जमा केली जात आहेत असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच याच विषयाबाबत ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यांनी देखील उडवाउडवीची उत्तरे देत उलट गावकऱ्यांना दमदाटी केली. तुमच्याकडून जे होईल ते करा असे उद्धटपणे उत्तर दिले. आज आम्ही ग्रामसेवकाला वीस ते तीस वेळा फोन केले. परंतु त्यांनी फोन घेतला नाही आणि नंतर फोन बंद करून ठेवला.
त्यामुळे ग्रामसेवकाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच विश्वनाथ सुकवड ग्रुप ग्रामपंचायतीची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच, ग्रामसेवक आणि सर्व गावकऱ्यांना घेऊन जाहीर ग्रामसभा घ्यावी आणि घरकुल योजनेसाठी लाभार्थ्यांची यादी तयार करावी, अशी मागणी देखील केली आहे. त्वरित ग्रामसभा घेऊन पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
निवेदनावर कल्पेश साळुंखे, गणेश पाटील, पंकज पाटील, किशोर पाटील, दिनकर पाटील, अधिकार पाटील, समाधान पाटील, ज्ञानेश्वर पाटील, किशोर साळुंखे, भगवान पाटील, रमेश पाटील आदींच्या सह्या आहेत.