धुळे जिल्हा परिषदेत आता सेवानिवृत्तीच्या दिवशीच मिळणार सेवानिवृत्तीचे सर्व लाभ
धुळे : जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवा विषयक सर्व लाभ देण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गार नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काढले. 31 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांना गमे यांच्या हस्ते सेवा विषयक सर्व लाभाचे वितरण शुक्रवारी करण्यात आले.
जिल्हा परिषद अंतर्गत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शेवटच्या दिवशी सेवा विषयक सर्व लाभ देऊन सन्मानाने निरोप देण्याचा स्तुत्य उपक्रम जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी ऑगस्ट 2023 पासून सुरू केला. आहे. 31 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या सेवेतून निवृत्त होणाऱ्या एकूण 15 कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते सर्व सेवा विषयक लाभ देऊन निरोप देण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, उपायुक्त श्रीमती उज्वला बावके, सहाय्यक आयुक्त राजेंद्र पाटील यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या संकल्पनेतून धुळे जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले. तसेच यापुढेही हा कार्यक्रम अशाच पद्धतीने सुरू ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कर्मचाऱ्यांना मिळाले लाभ : या कार्यक्रमामध्ये भीमराव झिपा सोनवणे, परिचर, गोरख दौलत पाटील, शाखा अभियंता, जीवन दौलत कोळी, मैल मजूर, आनंदा गोबजी माळी, मैल मजूर, सुधाकर कमलाकर काळे, कनिष्ठ अभियंता, नंदराम आत्माराम बिरारीस, ग्राम विकास अधिकारी, सुनील काशिनाथ मोरे, आरोग्य सहाय्यक, राजेंद्र भालचंद्र देव, कनिष्ठ सहाय्यक, रामकृष्ण बाबुराव खैरनार, प्राथमिक शिक्षक, वसंत बारकू साटोटे, भुरा राजाराम हाके, श्रीमती आशा साहेबराव सोनवणे, प्राथमिक शिक्षक, रामदास अणाजी शिंदे, मुख्याध्यापक, श्रीमती प्रमिला पौलाद साळवे, मुख्याध्यापिका, श्रीमती लीना ज्ञानदेव सोनवणे, मुख्याध्यापक या 15 कर्मचाऱ्यांना सेवा विषयक सर्व लाभ मंजूर आदेश असलेली बॅग आणि शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये सेवानिवृत्ती आदेश, रजा रोखीकरण, भविष्य निर्वाह निधी, गट विमा, उपदान मंजुरीचे आदेश यांचा समावेश आहे.
कार्यक्रमास सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब आकलाडे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, कार्यकारी अभियंता श्रीमती जयश्री सारवे, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर यांच्यासह विविध विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. सेवानिवृत्तीच्या दिवशीच सर्व सेवा विषयक लाभ मिळाल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.