चला नव्याने सुरुवात करूया..!
धुळ्याच्या सांस्कृतिक पर्यावरणाचा आढावा घेत असताना इथल्या प्रदेशाचा ऐतिहासिक उल्लेख असलेला दस्त चाचपडत होतो. यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावाने प्रचलीत असलेला हा भूभाग महाभारताच्या भिष्म पर्वात उल्लेख असलेला ‘खंडा’ प्रदेश म्हणजेच खानदेश (असा अर्थ पाश्चात्य इतिहासकारांच्या अहवालानुसार) तर काहींच्या मते कृष्णाचा देश कान्हदेश म्हणून खानदेश, तर फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी बहाल केली होती व त्यावरुन खानदेश, असे वेगवेगळे उल्लेख सापडले. या प्रदेशाचे प्राचीन नाव रसिका होते असेही काही उल्लेख इतिहासाच्या पानांवर आढळतात! रसिका हे नाव मनाला भावलं, इथली सांस्कृतिक रसिकता जोपासणारी ऐतिहासिक संस्कृती डोळ्यासमोर तरळली…
सांस्कृतिक वारसा इथे उत्खननामध्ये सापडला जो सम्राट अशोकाच्या काळाची साक्ष देतो. पितळ खोऱ्यातील लेण्यांमध्ये सातवाहन वंशाची चाहूल सुद्धा लागते. एकूण काय तर सांस्कृतिक दृष्ट्या पराकोटीचे वैभव लाभलेलं हे एके काळी समृद्ध असलेलं शहर आज कुठे आहे? कुठल्याही प्रदेशाची सांस्कृतिकता ही तिथल्या आहार विहार पद्धती, लोंकांच्या आवडी निवडी, तिथली तरुणाई आणि भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीनुसार ठरत असते.
खान्देशचा भूभाग भौगोलिक स्थित्यंतरानुसार 66 लाख वर्षांपूर्वी तयार झाला. पांझरा नदी ही 10 लाख वर्षांपूर्वी शेंदवडच्या डोंगरातून उगम पावली. या नदीवरची प्राचीन जलसिंचन व्यवस्था जगामध्ये कौतुकाचा विषय ठरली होती पण ती सुद्धा मरणासन्न अवस्थेत आहे, आज धुळेकर जनतेला पिण्यायोग्य पुरेसं पाणी सुद्धा मिळत नाही, ते इथल्या राजकीय नाकर्तेपणामुळे! नियोजन शून्यतेने शापित बनलेले धुळेकर पाण्यासाठी वणवण करीत गेले अनेक वर्षे वाट पाहत आहेत. कोट्यवधी रुपयांच्या पोकळ अश्वासनानांच्या जोरावर, कित्येक वर्षांपासून मुंगीच्या वेगाने सुरू असलेली बहुतांश ‘विकास’कामे धुळेकरांना माहीत आहेत. ती कधी पूर्ण होतील याची प्रतीक्षा आहे.आणि हे मृगजळ वाटावं अशी सध्याची परिस्थिती आहे. इथे शैक्षणिक वातावरण खूप आधी पासून आहे, दूर दूर वरून असंख्य विद्यार्थी इथे शिकायला येतात! मुबलक तरुणाई उपलब्ध असलेल्या या शहरात साडेसातशे च्या वर अंगण वाड्या असलेल्या आणि असंख्य खाजगी विद्यालयांची गर्दी असलेल्या या शहरात विधी महाविद्यालय,चार वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, औषध निर्माण महाविद्यालय, कला, तंत्र निकेतन, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांची रेलचेल असून देखील सांस्कृतिक आरोग्य अजूनही मृत्यू शय्येवर आहे. इथे नाट्य चळवळ निद्रिस्त अवस्थेत पडून आहे. वादविवाद, वक्तृत्व, नाट्य स्पर्धा, एकपात्री, हस्तकला, चित्रकला, हस्ताक्षर, सुगम गायन स्पर्धा, वाद्य वादन स्पर्धा यांचा एकेकाळी सुकाळ होता. इथूनच अनेक गुणी कलावंत महाराष्ट्राला मिळाले. पण आज त्या स्पर्धा सुद्धा दुर्मिळ झाल्या आहेत.
एकविरा मंदिराची यात्रा अजूनही तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. कुस्त्यांच्या स्पर्धा अजूनही रंगतात. धुळे नगर पालिकेचा पहिला दवाखाना १८७९ मध्ये स्थापन झाला. त्या दवाखान्यात मध्यंतरी औषधांचा, डॉक्टरांचा तुटवडा होता. पण त्या सरकारी दवाखान्यांमुळे कित्येक गोरगरिबांना आरोग्यदायी आधार मिळाला.
चिंतन, मनन करण्यासाठी, कविता स्फुरण्यासाठी, स्फुट लिहिण्यासाठी असलेलं धुळ्यातील सर्वात शांत ठिकाण म्हणून हनुमान टेकडी, नकाणे तलाव, डेडरगाव तलाव, एमआयडीसी तलाव, तिथली झाडी, तिथे येणारे प्रवासी पक्षी प्रसिद्ध होते. पण या ठिकाणापर्यंत आता शहर आणि शहराचा कोलाहल येऊन ठेपला आहे. इंडियन रेड क्रॉस सोसायटी असलेलं शहर, अपंग, कर्णबधिर अंधांसाठी सदोदित सहानुभूती आणि मदत करणाऱ्या या शहराने त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शाळांची निर्मिती केली. अहिराणी साहित्यात आपला ठसा उमटवणारे अनेक प्रगल्भ व्यक्तिमत्वे धुळ्याने दिली. समर्थ वाग्देवता मंदिर, दगडी बांधकामातील विठ्ठल मंदिर, सव्वाशे वर्षांपासून सुरू असलेलं शासकीय तांत्रिक विद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समितीचं पटांगण, तिथून जवळच असलेलं नाट्यमंदिर हे इथल्या सांस्कृतिक पर्यावरणाचा समतोल राखत आले आहेत. महाराष्ट्र केसरी मल्ल घडविणारी भांग्या मारुती व्यायाम शाळा, विजय व्यायाम शाळा इथल्या मातीला धष्ट पुष्ट बनवत राहिली.
१६३ वर्षाचा इतिहास असलेली ऐतिहासिक धुळे नगरपालिका आपल्या परीने झेपेल तसे आणि उरले तर करू या उक्तीप्रमाणे जमेल तसे विकासकामे करत असते. शिस्त लावणारे अधिकारी इथे फार काळ टिकत नाही! आणि राजकीय अनास्था इथला सर्वात मोठा शाप आहे!
अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांच्या या गावात महात्मा गांधीजींचा पुतळा, सावरकर पुतळा, छत्रपतींचे पुतळे, बाबासाहेबांचा पुतळा, सरदार पटेलांचा पुतळा, नेताजी सुभाष चंद्र बोसांचा पुतळा, सावित्रीबाई फुलेंचा पुतळा, झाशीच्या राणीचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा, चाचा नेहरूंचा पुतळा, महाराणा प्रताप पुतळा, अग्रसेन महाराज पुतळा, शहीद अब्दुल हमीद पुतळा आणि अनेक संतांचे पुतळे सुद्धा उभारलेले आहेत. पण पुतळ्यांच्या या शर्यतीत महापुरुषांचा विचार मागे पडला आणि अनुयायांच्या भाऊगर्दीने एक उथळ भंपक प्रवाह निर्माण केला.
गरुड वाचनालयात बसायला जागा पुरत नव्हती; इतकी वाचनाची ओढ असलेल्या या गावात आज पुस्तकं वाचकांची वाट पाहत वाचनालयाच्या कप्प्यांमध्ये पडून आहेत. तरुण पीढिच्या आवडीनिवडी बदलल्या. प्राधान्यक्रम बदलले. रोजगार नसल्याने बकाल झालेल्या या शहरातून खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले. कोणे एके काळी गझल गायकीचे कार्यक्रम, कव्वालीचे कार्यक्रम, संगीत रजनी, मुशायरा, भजनं, कीर्तन , लावणी, हास्य कवी समेलनांची एकेकाळी मेजवानी असायची. गेले ते दिवस, उरल्या फक्त आठवणी!
परंतु आजही तो समृद्ध वारसा जपणारे अनेक गुणी स्थानिक कलावंत शहरात धडपडताना दिसतात. कलावंतांच्या कलेला यथेच्छ दाद देणारे अनेक दर्दी आजही चोखंदळ रसिक बनून दर्जेदार कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहतात. मात्र आता कार्यक्रम दुर्मिळ झाले आणि कार्यक्रम आयोजित जरी केले तरी दर्जा घसरला. आणि त्यातसुद्धा राजकीय हस्तक्षेप जास्त व्हायला लागला. कार्यक्रमात पुढाऱ्यांची भाषणं रटाळ वाटू लागली अशी परिस्थिती आहे. पुढाऱ्यांच्या सोफ्यांवर खर्च वाढला आहे आणि कलावंत मात्र नाममात्र मानधनावर तिष्ठत उभ्यानेच कला सादर करतो आहे. रिकाम्या पोटी किती दिवस सांस्कृतिकता जपायची इथल्या कलावंतांनी? उभं आयुष्य कलेच्या जोपासनेत घालवल्यानंतर पदरी पडलेली निराशा नाही लपवता येत त्यांना! आणि आज काल कार्यक्रम करायचे म्हणजे, भला मोठ्ठा डीजे मागवायचा, लेजर लाईट शो नाचवायचा, थिल्लर गाणी वाजवायचे, मंचावर ढीगभर पुढारी बसवायचे असे नवे असांस्कृतीक समीकरण प्रचलित होते आहेत.
भेसूर चेहऱ्यांच्या अजस्त्र होर्डिंग्जची स्पर्धा सुरू झाली आणि शहरातल्या सांस्कृतिक वातहतीला सुरवात झाली. इथल्या सर्वसामान्य माणसांच्या कानी आता सुमधुर गाणी कमी आणि डेंग्युच्या डासांची गुणगुण जास्त ऐकू येते. सरकारी अनास्था लाभलेल्या या गावातली सर्वसामान्य माणसं मेटाकुटीला आलेली आहेत. मूलभूत सुविधांचा अभाव वर्षानुवर्षे अनुभवत दिवस पुढे ढकलण्यात, सांस्कृतिकता जपण्याचे आत्मभान हरवून बसलेल्या या गर्दीला पुन्हा रसिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडणं कठीण होत चाललं आहे. वैचारिक गप्पांचे कट्टे होते; स्वागत पेयालय, गजानन चहा, राणाप्रताप चौक, जुनं अमळनेर स्टँड, गरुड वाचनालयाचे सभागृह, भट स्मृती सभागृह, किती तरी ठिकाणी वैचारिक चर्चा घडवून यायच्या. एखाद्या चित्रपटावर, नाटकांवर चर्चासत्र आयोजित केले जायचे. श्रमिकांच्या मनोरंजनासाठी यात्रा भरायची. भारुड, कीर्तन, तमाशा यायचा. गरुड मैदानावर सर्कस यायची. क्रिकेट, खो-खो, कबड्डीच्या कुस्त्यांच्या स्पर्धा रंगायच्या. त्या मैदानाचं व्यापारी संकुल बनवून अतिशय वाईट अवस्थेत त्या मैदानाची दैना झाली आहे.
१२३ वर्षांचं रेल्वे स्टेशन आपलं रूप बदलतं आहे. तिथल्या अतिक्रमणामुळे ते बाहेरून दिसूनच येत नव्हतं, ते आत्ता कुठे दिसायला लागलं आहे. तिथे फडकणारा तिरंगा हा शहराच्या सौंदर्यात भर घालतो आहे. या शहरात वास्तव्याला होते अनेक दिग्गज. महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी,सर विश्वेश्वरय्या,बाबासाहेब आंबेडकर, किती किती म्हणून सांगू!
दगडी शाळा, धुळे एज्युकेशन सोसायटीच्या शाळा, सुगंधाने दरवळलेला फुलवला चौक, संतोषी माता चौक, किसन बत्तीचा खुंट, पाच कंदील, शंकर मार्केट, लळींग किल्ला अशी अनेक ठिकाणं आपापली सांस्कृतिक ओळख अबाधित ठेवून आहेत. १८२५ साली शिक्षणाच्या महत्वाला लक्षात घेऊन ज्या धुळे नगरपालिकेने पहिली भक्कम अशी दगडी शाळा सुरू केली, तिलाच 200 वर्षानंतर जमीनदोस्त करून त्या जागेवर महानगरपालिकेची इमारत बांधून शाळांच्या महत्वाला कमी करण्याची वृत्ती निपजली. एकेकाळी विणकाम, चित्रकला या क्षेत्रांत प्रगती साधलेलं हे गाव! आज सांस्कृतिक अस्तित्वासाठी झगडतं आहे!
सांस्कृतिक बैठक तयार करण्यासाठी अजून एक महत्वाचा घटक असतो तो म्हणजे वर्तमानपत्र!निर्भीड पत्रकारिता करत प्रसंगी जीवाची पर्वा न करता सत्तेचा कान पिळणारे अग्रलेख लिहिणारे पत्रकार कालौघात लोप पावले आणि दर्जेदार लेखमालांची जागा जाहिरातींनी घेतली. पण त्या गर्दीतही बोटावर मोजणारे काही प्रामाणिक धाडसी पत्रकार अजूनही ते स्थंडील धगधगत ठेवत आहेत.
राजकीय मतभेद वैचारिक पातळीपर्यंत मर्यादित होते, आकस नव्हता, द्वेष नव्हता. पण वैय्यक्तिक पातळीवर संपवून टाकण्याची भाषा करणाऱ्या गुंडांची वर्णी राजकारणात लागली आणि ऱ्हास सुरू झाला. इथल्या कारागृहाने विनोबा भावेंनी लिहिलेला गीताई पाहिला आणि त्याच कारागृहाने गावगुंडांची मिरवणूक सुद्धा पाहिली.
सामाजिक विषमतेला दूर सारून गुण्यागोविंदाने राहणारी बाजारपेठ सर्व धर्मियांना, सर्व जातींना सामावणारी होती. त्याच बाजारपेठेने धर्मांध दंगली झेलल्या. चुकलेलं नियोजन भोगणारी ही बाजारपेठ आगीत होरपळली तेव्हा तिच्या अरुंद बोळीतून अग्निशामक दलाची गाडी सुद्धा जाऊ शकली नाही. इथल्या सामान्य माणसांच्या धाडसाने ती आग विझली होती.
१२ व्या शतकात अल्लाउद्दिन खिलजीचं आक्रमण सोसलेला हा प्रदेश १८ व्या शतकात दुष्काळाने वाळवंट बनला होता. १८१९ साली ‘कॅप्टन ब्रीज्ज’ याने ‘धुळे‘ चे केंद्रीय स्थान व हिंदुस्थानला जोडणारा दुवा म्हणून ‘धुळे’ आपले मुख्यालय म्हणून स्थापन केले आणि पुन्हा हे शहर नव्याने वसवले. आपणही इथल्या राजकीय प्रदूषणाने जर्जर झालेल्या आपल्या गावाला पुन्हा सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न बनवण्यासाठी प्रयत्नशील व्हायला हवे. इथल्या सजग नागरिकांनी पुढाकार घेऊन सांस्कृतिक चळवळ उभारणे गरजेचं आहे. सर्वसमावेशक प्रयत्नांनी हे शक्य आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे गाव पुन्हा सुजलाम् सुफलाम् होवो या आशावादाला उराशी कवटाळून नव्याने सुरुवात करूया…!
– डॉ. अभिनय दरवडे, संगोपन बालरुग्णालय, धुळे
सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ, कलावंत
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सदस्य.