पीएम कुसूम-ब योजनेसाठी अर्ज सादर करा
धुळे : महाकृषि ऊर्जा अभियानतंर्गत राज्यातील शेतकऱ्यांना कृषिंपप वीज सौरऊर्जेद्वारे जोडण्यासाठी प्रधानमंत्री कुसूम-ब योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावे असे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी बोडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषि वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषिपंप शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या योजनेतंर्गत 3 एचपी ,5 एचपी व 7.5 एचपी क्षमतेचे सौर कृषिपंप 90 ते 95 टक्के अनुदानावर उपलब्ध आहे. सौर कृषिपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रगर्वातील शेतकऱ्यास 10 टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरता येईल. शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास 1 लाख 4 हजार 823 सौर कृषिपंपासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित केले आहे. महाऊर्जामार्फत सद्यस्थितीत सुमारे 77 हजार 778 सौर कृषिपंप आस्थापित केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्यासाठी https://kusum.mahaurja.com/ solar/beneficiary/register/ Kusum-Yojana-Component-B हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांकडून कागदपत्रे अपलोड करणे, अर्जाची छाननी करणे, शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएस पाठविणे, लाभार्थी हिस्सा ऑनलाईन भरणे व पुरवठादाराची निवड करण्याची मुभा शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज सादर करावे असे आवाहन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे जिल्हा व्यवस्थापक बोडके यांनी केले आहे.