थर्टी फर्स्टच्या बंदोबस्ताला दांडी मारणारे सात पोलीस कर्मचारी निलंबित
धुळे : थर्टी फर्स्टच्या दिवशी बंदोबस्ताला दांडी मारणाऱ्या सात पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित केले आहे.
निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे अशी : साक्रीच्या दंगा काबू पथकातील पोलीस शिपाई प्रदीप भटूसिंग ठाकरे, राकेश प्रकाश बोरसे, महिला पोलिस हवालदार मुक्ता इच्छाराम वळवी, पोलीस शिपाई विनोद पंडित गांगुर्डे, किशोर श्रीराम परदेशी, यांच्यासह धुळे येथील नियंत्रण कक्षातील हवालदार महेंद्र दौलतसिंग ठाकूर आणि मोटार परिवहन विभागातील चालक पोलीस कॉन्स्टेबल अमोल रमेश भामरे यांचा समावेश आहे.
थर्टी फर्स्टच्या दिवशी धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करता याव्यात यासाठी मद्यपि वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना सतर्क राहून कर्तव्य बजावण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यादरम्यान धुळे जिल्हा पोलीस दलातील दंगा काबू पथकातील काही पोलीस अंमलदार अती महत्त्वाच्या बंदोबस्तात गैरहजर आढळून आले. तर काही अंमलदारांना वरिष्ठांनी बिनतारी संदेशाद्वारे कॉल दिला असता; बिनतारी संदेश सोडून कुणाचीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे कर्तव्यावर गैरहजर आढळून आले. अती महत्त्वाच्या व संवेदनशील बंदोबस्तावर गैरहजर राहिल्याप्रकरणी पोलीस अंमलदारांना सेवेतून निलंबित केले असून, त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले.
भविष्यात अमलदारांकडून शिस्तीची अंमलबजावणी होइल या उद्देशाने निलंबनाची कारवाई पोलिसांकडून मुद्दाम हाईलाइट केली जात आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याची गंभीर नोंद घ्यावी,असा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. आगामी निवडणुका आणि इतर बंदोबस्ता करीता कारवाईचे पाऊल उचलल्याचे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा