ACB Trap लाचखोर मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेला चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहात पकडले. अर्चना बापूराव जगताप असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. सेवानिवृत्त शिक्षकाचे गटविमा देयक अदा करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागितली होती.
श्रीमती अर्चना बापूराव जगताप (वय 39, पद – मुख्याध्यापिका शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, अक्कलकोस ता. शिंदखेडा, रा. अभिनव रो हाऊस क्रमांक 10 , गुलमोहर हाइट्सच्या मागे, मखमलाबाद रोड, नाशिक).
तक्रारदार हे सेवानिवृत्त शिक्षक असून त्यांचे गट विमा योजनेचे एक लाख 33 हजार रुपयांचे देयक रुपये हे प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, धुळे यांनी मंजूर केले होते. सदरच्या देयकाचे आहरण व संवितरण करण्याचे काम मुख्याध्यापिकांकडे होते. रक्कम मिळण्यासाठी तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा करुनही उपयोग झाला नाही. मुख्याध्यापिकेने त्यांच्याकडे सदरचे देयक मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती चार हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. सदरची लाच रक्कम ही मुख्याध्यापिकेने पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई : पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रूपाली खांडवी, हवालदार राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, पोलीस वाहन चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या पथकाला नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, वाचक पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, धुळे
टोल फ्रि क्रं. 1064