भीमनगरात भीमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादनासाठी दिवसभर रांगा
धुळे : भीमा कोरेगावच्या युध्दाला यंदा २०६ वर्षे पूर्ण होत आहेत. भीमा कोरेगाव येथे गेल्या काही वर्षांपूर्वी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी जनसमुदायावर हल्ला करण्यात आला होता. यानंतर भीमा कोरेगावच्या इतिहासाचा सर्वांनाच परिचय झाला. त्यामुळे १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर उसळतो. आंबेडकरी जनता प्रचंड संख्येने राज्यासह देशाच्या विविध भागातून भीमा कोरेगावला येत असते.
प्रचंड गर्दीमुळे सर्वांनाच तिथे जाणे शक्य नसते. हे ओळखून माजी नगरसेवक जितेंद्र उंदा शिरसाठ यांनी स्वखर्चाने भीमा कोरेगाव विजयस्तंभाची हुबेहूब प्रतिकृती उभारली. धुळे शहरात साक्री रोडवरील भीमनगर येथे प्रवेशद्वाराशेजारी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या मध्यभागी उभारलेला हा विजयस्तंभ सर्वांचे लक्ष वेधून घेतो. जे आंबेडकरी अनुयायी भिमाकोरेगावला अभिवादनासाठी जाऊ शकत नाहीत ते भीमनगरात येऊन भीमा कोरेगाव प्रतिकृतीला अभिवादन करतात.
इंजीनीयर धर्मेद्र झाल्टे यांच्या सहकार्याने उभारलेल्या या प्रतिकृतीला यंदा सात वर्षे पूर्ण होत आहेत. दरवर्षी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री तसेच १ जानेवारीला दिवसभर व रात्री अभिवादनासाठी मोठी गर्दी उसळते. डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष पाहण्यासारखा असतो.
यावर्षी देखील भीमनगरात भीमा कोरेगावच्या प्रतिकृतीला आंबेडकरी जनतेने अभिवादन केले. दर वर्षी ही संख्या वाढतच आहे.
जितेंद्र शिरसाठ व युवानेते धनराज शिरसाठ यांनी आलेल्या जनतेचे स्वागत करून सर्वाना अभिवादनाची सोय करून दिली. त्यामुळे जितेंद्र शिरसाठ यांच्या कार्याचे सर्वांनीच कौतुक केले.