हिट ॲन्ड रन कायद्याच्या विरोधात चक्काजाम करण्याचा वाहन चालकांचा इशारा
धुळे : हिट ॲन्ड रन केसचा नवीन कायदा रद्द केला नाही तर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा धुळे जिल्ह्यातील वाहन चालक आणि मालक संघटनेने सोमवारी दिला. शहरासह जिल्ह्यातील चालक आणि मालकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
केंद्र सरकारने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. या विरोधात देशभरातील बस, ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. हा कायदा वाहन चालकांच्या हिताचा नाही, असे वाहन चालकांचे म्हणणे आहे. तसेच नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होणार आहे. मात्र, अपघात घडवून आणणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होईल, अशी तरतूद या कायद्यात आहे.
केंद्र शासन व राज्य शासन यांनी ट्रॅव्हल्स चालक-मालक व प्रवासी वाहतूकदार यांना टोल टॅक्समध्ये सूट द्यावी, विविध टॅक्समध्ये कपात करावी, नवीन कायदा रद्द करावा आधी मागण्या निवेदनात केल्या आहेत. नवीन कायद्यामुळे चालक-मालक देशोधडीला लागतील. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक वेळेस वाहन चालकाची चूक नसते. तर काही विपरीत परिस्थितीमुळे अपघात होत असतात. असे असताना नवीन कायद्यानुसार कार्यवाही झाली तर वाहन चालकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी या कायद्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच तीन दिवस बंद पाळण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. शिवाय चक्काजाम आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला दिला.
निवेदन देताना पवन वरपे, देविदास गोसावी, शैलेंद्र लिंगायत, परेश अग्रवाल, जसा यादव माळी, पप्पू थोरात, नितीन भोकरे, अर्जुन धनगर, कृष्णा पारखे, नितीन पाटील, निलेश गवळी, चेतन गवळी, राजू गवळी, छोटू पाटील, मनोज पाटील, प्रमोद बाविस्कर, बापू चौधरी, बंटी पाटील, योगेश चौधरी, महेश नेरकर, सुनील आव्हाड, विनोद देवरे, मनोज सूर्यवंशी, राजेश धनगर, रावसाहेब मोरे, विजू पाटील, अशोक पाटील, नितीन वाघ, राकेश चौधरी, विशाल येरडावकर, चिदानंद जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचा