दुसरे लग्न करणाऱ्या नवरदेवाची वरात निघाली थेट पोलीस ठाण्यात
धुळे : पहिल्या लग्नाबद्दल वधूपक्षाला माहिती न देता नवरीची फसवणूक करत दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढायच्या तयारीत असलेल्या एका नवरदेवाची वरात लग्न मंडपातून थेट पोलीस ठाण्यात निघाल्याची घटना धुळे शहरात रविवारी दुपारी घडली. गोकुळ किशोर विसपुते असे या नवरदेवाचे नाव आहे.
धुळे शहरातील सुवर्णकार मंगल कार्यालयात ऐन लग्न लागण्याच्या वेळी हा प्रकार उघडकीला आला. पहिले लग्न लपवून दुसरा विवाह ठरवून फसवणूक करणार्या वरासह चौघांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत भारती नारायण पिंगळकर (वय ४१, रा. श्रीरंग कॉलनी, देवपूर) यांच्या फिर्यादीनुसार, गोकुळ किशोर विसपुते याने त्याचे पहिले लग्न झालेले असताना त्याबाबत माहिती न देता त्यांच्यासह त्याचे वडील किशोर विसपुते, आई अनिता विसपुते, काकु अंजना विसपुते (सर्व रा. धुळे) यांनी मुलीशी लग्न जुळविले. लग्नापोटी ५० हजार रूपये घेवून फसवणूक केली.
याप्रकरणी चौघांवर भादंवी कलम ४२०, ४१७, ४९५, ३२०, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा