मॅरेथाॅनमध्ये धावली तरुणाई, रक्तदानाने नववर्षाचे स्वागत
धुळे : बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे आयोजीत कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास सोमवारपासून (तारीख १) प्रारंभ झाला. यात मॅरेथाॅन व रक्तदान शिबीराने नववर्षाचे स्वागत करण्यात आले. रक्तदान शिबिरात ३७० रक्तदात्यांनी रक्तदान केले. मॅरेथाॅन स्पर्थेत जिल्ह्यातील तरुणाई धावली. या मॅरेथाॅनमध्ये सव्वा पाचशे युवक- युवतींनी सहभाग नोंदविला. या जिल्हास्तरीय मॅरेथॉनचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कबड्डीपटू महेंद्र राजपूत हे उपस्थित होते.
तीन दिवस चालणार्या या महोत्सवात तीन दिवसीय किर्तन सोहळा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी नववर्षाचे स्वागत केले जात असल्याबद्दल प्रतिष्ठानचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी एक ते तीन जानेवारीदरम्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही रक्तदान व मॅरेथाॅनने या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात झालेल्या या जिल्हा मॅरेथाॅन स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कबड्डी व प्रो कबड्डी स्पर्धा खेळाडू महेंद्र राजपूत, प्रतिष्ठानचे रावण भदाणे, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. सयाजी भामरे, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे, प्रतिष्ठानच्या सचिव तथा जि. प. सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे, पोलीस उप निरीक्षक राजश्री पाटील, माजी जि. प. सदस्य प्रभाकर पाटील, देविदास माळी, पं. स. उपसभापती देवेंद्र माळी, माजी उपसभापती नारायण देवरे, सरपंच सुनिता भदाणे, डॉ. राजेंद्र भदाणे, प्राचार्य शरद बेहरे, बिजू जॉर्ज, माजी सरपंच राजेंद्र मराठे, पं. स. सदस्य बाबाजी देसले, नाणे सरपंच अजय राजपूत, मोरदड सरपंच गोविंदा पाटील, माजी पं. स. सदस्य सोपान पाटील, भिरडाई सरपंच राजेंद्र पाटील, रवी माळी, रावसाहेब पाटील, डाॅ. प्रा. अनंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यांनी जिंकली मॅरेथॉन : युवकांमध्ये दिनेश किशन पाटील, आकाश झुंगा लोते व ससिंग आदरजी पावरा यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर अतुल शांताराम बर्डे व गिनेश जिर्या वळवी यांनी उत्तेजनार्थ पारितोषीक पटकावले. तसेच युवतींमध्ये शेवंता तुळशीराम पावरा, आरती अर्जून पावरा, सुनिता भरत पावरा यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविला तर जान्हवी संजय रोझोदे व रिया रब्बा पावरा यांनी उत्तेजनार्थ पारितोषीक पटकावले.
यावेळी मॅरेथाॅनमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीक वितरण करण्यात आले. ही मॅरेथाॅन स्पर्धा १५ ते ३५ वर्ष वयोगटातील युवक व युवतींसाठी खुली होती. ‘एक धाव सुदृढ आरोग्यासाठी’ या घोषणेने होणार्या या स्पर्धेत अनुक्रमे १० हजार, सात हजार, पाच हजार अशी प्रत्येक दोन व एक हजार रुपयाची चार विशेष उत्तेजनार्थ पारितोषीक देण्यात आली. तसेच सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यात युवक व युवती या दोन्ही गटासाठी स्वतंत्ररित्या पारितोषिक ठेवण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. जगदीश बोरकुंडकर, प्रास्तविक प्रा. बापूसाहेब मगर तर आभारप्रदर्शन प्राचार्य शरद बी. बेहरे यांनी केले. नागरीकांमध्ये विशेषत: तरुणांमध्ये आरोग्यसंदर्भात जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशाने या भव्य मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
370 दात्यांचे रक्तदान : नववर्षाचे स्वागत रक्तदान शिबीराने करण्यात आले. यात एक जानेवारी रोजी सकाळी बोरकुंड येथील मुक्तांगण शैक्षणिक संकुलात रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. या शिबिराचा शुभारंभ भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. सयाजी भामरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दररोज कीर्तनातून लोकशिक्षण : एक जानेवारी ते ३ तीन जानेवारीदरम्यान तीन दिवस किर्तनाचा गजर असणार आहे. यात निवृत्ती महाराज इंदुरीकर, सोपान शास्त्री सानप हिंगोलीकर व किशोर महाराज दिवटे जालना यांचे कीर्तन होतील. दि.३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त, शिक्षणप्रेरिका सावित्रीबाई फुले या विषयावर व्याख्यान होईल. पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमातील कवी तथा प्रसिद्ध लेखक प्रेमचंद अहिरराव हे यावेळी व्याख्याते म्हणून राहतील. हा महोत्सव क्रीडा, धार्मिक, आरोंग्य, युवक, प्रबोधन, सामाजिक, सांस्कृतीक आदी क्षेत्रात रस असणार्यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
इंदूबाई भदाणे प्रतिष्ठानचे उपक्रम : वाटचाल शाश्वत विकासाकडे हा मुलमंत्र अंगिकारत इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानची विविध क्षेत्रात यशस्वी वाटचाल सुरु आहे. प्रतिष्ठानने आरोंग्य, क्रीडा, शिक्षण, युवक कल्याण, महिला सक्षमीकरण, सामाजिक, सांस्कृतीक, पर्यावरण, ग्रामविकास, कृषी आदी क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. ‘निष्काम जन सेवायं समर्पिता’ या ब्रीदवाक्याने प्रेरीत होऊन प्रतिष्ठानतर्फे विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात. दरवर्षी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाने नववर्षाचे स्वागत केले जाते.
आयोजकांचे आवाहन : बोरकुंड मुक्तांगण शैक्षणिक प्रांगणाच्या होणाऱ्या या कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवास उपस्थितीचे आवाहन इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे व प्रतिष्ठानच्या सचिव तथा जि. प. सदस्या शालिनीताई बाळासाहेब भदाणे यांनी केले आहे.