कुसुंबा-दोंडाईचा राष्ट्रीय महामार्गाचे लामकानी येथे भूमिपूजन
धुळे : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत नव्हे तर त्यांच्याकडे बसून आग्रही मागणीतून जिल्ह्यातील दोन राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतर केले. त्याचेच फलित म्हणजे आज एकूण २७६ कोटी रुपये निधीतील दोंडाईचा ते मालेगाव या राष्ट्रीय महामार्गातील कुसुंबा ते दोंडाईचा या सुमारे ७६ कोटींच्या निधीतील दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन होत आहे. हा महामार्ग मुंबई-आग्रा व नागपूर-सुरत या दोन राष्ट्रीय महामार्गांना छेदत जाणार असल्याने जिल्हावासीयांची मोठी सोय होणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज केले.
खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते आज लामकानी (ता. धुळे) येथे कुसुंबा ते दोंडाईचा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० चे भूमिपूजन झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश सहसंयोजक उत्कर्ष पाटील, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, राम भदाणे, आशुतोष पाटील, पंचायत समिती सदस्य तुषार महाले, रितेश परदेशी, तारासिंग भिल, शंकरराव खलाणे, रावसाहेब गिरासे, हरीश शेलार, शरद पाटील, विकास सोसायटीचे अध्यक्ष बिपीन पाकळे, माजी सरपंच शिवराम तेले, माजी पंचायत समिती सदस्य बी. सी. महाले, सामाजिक कार्यकर्ते बी. सी. चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदारकीसाठी पुन्हा आशीर्वाद द्या
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात रस्ते, पाणी, रेल्वे आदी पायाभूत सुविधांची गरज असते. याच गोष्टींचा प्राधान्यक्रम ठरवत आपण संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघात हजारो कोटींच्या निधीतून राज्य, राष्ट्रीय महामार्गांचे जाळे तयार केले. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी २५०० कोटी रुपयांचा निधी आणला. या योजनेचे ७० टक्के काम पूर्णत्वास आले असून, पुढील वर्षी जामफळ धरणातून धुळे तालुक्यातील १०० व शिंदखेडा तालुक्यातील १०० अशा २०० गावांना पिण्यासह सिंचनासाठी पाणी मिळेल. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गांतर्गत धुळे ते नरडाणा या ५६ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यातील भूमिअधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच रूळ टाकण्यास प्रारंभ होईल. यातून जिल्ह्यातील धुळे व नरडाणा या औद्योगिक वसाहतींत उद्योगांची संख्या वाढत आहे. मतदारसंघातील गावागावांत विविध योजनांतून रस्ते, पाणी, काही ना काही विकासाची कामे सुरू आहेत. ही वाटचाल अशीच पुढे सुरू ठेवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीतही मतदारांनी पुन्हा आशीर्वाद द्यावा, अशी अपेक्षाही खासदार डॉ. भामरे यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे धुळे जिल्ह्यातील राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतर करण्याची मागणी सातत्याने लावून धरली. यामुळे श्री. गडकरी यांनी राज्यातील केवळ ३ राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतर केले. यात एक लातूरचा तर अन्य दोन राज्य महामार्ग हे धुळे जिल्ह्यातील आहेत. यात दोंडाईचा ते मालेगाव व सोनगीर-दोंडाईचा-शहादा-अंकलेश्वर या महामार्गांचा समावेश आहे. याशिवाय साक्री-पिंपळनेर-नामपूर-देवळा व धुळे-सोलापूर या राज्य महामार्गांचाही राष्ट्रीय महामार्गांमध्ये समावेश केला. यामुळे धुळे जिल्ह्यात एकूण सहा राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत. यासाठी हजारो कोटींचा निधी आणला आहे. यातील कुसुंबा- ते मालेगावदरम्यान २०० कोटींच्या निधीतून काँक्रिटीकरणाचे दर्जेदार काम पूर्ण झाले असून, आता कुसुंबा ते दोंडाईचा या ७६ कोटींच्या निधीतील डांबरीकरणाचे काम सुरू होत आहे. यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांची दळणवळणाची मोठी सोय झाली आहे. भविष्यात डांबरीकरण झालेला हा दुसरा टप्प्याचेही काँक्रिटीकरण होईल, अशी ग्वाहीही खासदार डॉ. भामरे यांनी दिली.
लामकानीकरांनाही अक्कलपाडाचे पाणी देऊ
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की अक्कलपाडा प्रकल्पातून पिण्यासह सिंचनासाठी पाणी देण्याची मागणी लामकानीसह परिसरातील गावांकडून होत आहे. याबाबत कालच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली असून, त्यात काही उपाययोजना सुचविल्या गेल्या. त्यानुसार लवकरच कार्यवाही केली जाईल. अक्कलपाड्यातून पाणी मिळण्यासाठी ते केंद्रीय जल आयोगाकडून आरक्षित करावे लागते. त्यासाठीचा पाठपुरावा केला जाईल. तसेच अक्कलपाडा प्रकल्पात सध्या होत असलेला ६५ टक्के जलसाठा १०० टक्के करण्यासह बुडित क्षेत्रातील शेतजमिनींचे अधिग्रहण करण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीचा गरज आहे. यातून अक्कलपाडा प्रकल्पात सध्याच्या अडीच टीएमसीऐवजी चार टीएमसी जलसाठा होईल. यातून शासनाचे तब्बल ७०० कोटी रुपयांची बचत होणार असून, ही बाब राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली असून, लवकरच निधी मंजूर होऊन काम सुरू होईल. तसेच प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्याच्या पाटचाऱ्यांची दुरुस्ती व अन्य कामे प्राधान्याने होतील. यामुळे परिसरातील गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
दूरदृष्टिकोनाचे लाभले खासदार : पाटील
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील म्हणाले, की , धुळे लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे अनेक समस्या प्रलंबित होत्या. यापूर्वीच्या खासदारांना जे करता आले नाही ते गेल्या १९ वर्षांत खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी करून दाखविले. खासदार डॉ. भामरे हे दूरदृष्टीकोन असलेले व स्थानिक समस्यांची जाण असलेले नेते असून, त्यांच्यामुळे संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा समतोल विकास साधला जात आहे. तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत पाकळे यांनी प्रास्ताविक केले. सागर पाकळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.