अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मोर्चाने अक्कलकुवा दणाणले, प्रशासनाच्या नोटीसांची केली होळी
अक्कलकुवा : संपकाळात प्रशासनाने आणलेल्या बेकायदेशीर दबावाच्या निषेधार्थ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काढलेल्या मोर्चाने अक्कलकुवा शहर दणाणले होते. प्रशासनाने बजावलेल्या नोटिसांची होळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा, मोलगी, पिपळखुटा प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 12 जानेवारी रोजी अक्कलकुवा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला होता. या तीन प्रकल्पातील बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी अंगणवाडी कर्मचारी यांना संप काळात कामावर हजर होण्याच्या बेकायदेशीर नोटीस बजावल्या होत्या. तसेच पर्यवेक्षिका यांनी अंगणवाडी केंद्र सुरू करावे, आहार वाटप सुरू करावा व योजनेची दैनंदिन कामे करावीत, यासाठी दबाव आणला होता. या गोष्टींचा निषेध म्हणून अंगणवाडी कर्मचारी यांनी अक्कलकुवा बालविकास प्रकल्प कार्यालयावर निषेध मोर्चाचे नियोजन केले होता.
या मोर्चासाठी वरील तीनही प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी या मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या. मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी मोर्चात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दिला.
सुमारे 500 अंगणवाडी कर्मचारी यांनी प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या नोटिसांची होळी केली. निवेदन स्वीकारण्यासाठी तीनही बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका हजर होत्या.
संघटनेचे कार्याध्यक्ष युवराज बैसाणे, अक्कलकुवा तालुका अध्यक्ष इंदिरा पाडवी यांनी मोर्चासमोर मार्गदर्शन केले. तसेच या मोर्चासाठी संघटक सचिव राजू पाटील, वकील पाटील, अमोल बैसाणे, समाधान बोरसे यांनी विशेष सहकार्य केले.
हेही वाचा
राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर जोरदार धरणे आंदोलन