नरेंद्र मोदींना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा महायुतीचा निर्धार
धुळे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपच्या 15 घटक पक्षांचा महायुतीचा मेळावा रविवारी धुळ्यात झाला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीसह सर्व १५ घटक पक्षांच्या नेते,पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज येथे महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा होत आहे. एक विचाराने, एकदिलाने आज आपण येथे जमलो आहोत. येथे उपस्थित प्रत्येकामध्ये एक साधर्म्य आहे ते म्हणजे आपला देश आणि या देशाप्रती असलेला जाज्वल्य अभिमान. हा देशाभिमान जागृत ठेवत या महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपण महाराष्ट्रातून ४८ पैकी ४५ जागांवर महायुतीचे खासदार निवडून आणण्यासह २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा जगावर आपल्या नेतृत्वाची छाप उमटविणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.
येथील अग्रवाल विश्रामभवनात दुपारी बाराला भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व खरात गट, जनसुराज्य पार्टी, प्रहार जनशक्ती पार्टी, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमान, रयत क्रांती संघटना, भीमसेना, शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन रिपब्लिकन एकता मंच या १५ राजकीय पक्षांच्या महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा झाला, त्यात खासदार डॉ. सुभाष भामरे बोलत होते. मेळाव्याला माजी मंत्री तथा शिंदखेड्याचे आमदार जयकुमार रावल, शिरपूरचे आमदार काशिराम पावरा, साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित, माजी आमदार तथा धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार रामकृष्ण पाटील, महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक किरण शिंदे, भाजपचे समन्वयक अनुप अग्रवाल, शिवसेनेचे समन्वयक प्रसाद ढोमसे, आरपीआयचे समन्वयक ॲड. महेंद्र निळे, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, जिल्हाप्रमुख सतीश महाले, जिल्हाप्रमुख मनोज मोरे, महानगरप्रमुख संजय वाल्हे, महानगरप्रमुख संजय गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश सोनवणे, महानगर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, इर्शाद जहागीरदार, सुमित पवार, आरपीआय खरात गटाचे विशाल पगारे, आरपीआय आठवले गटाचे शशिकांत वाघ, भाजपचे जिल्हा सरचिटणीस शैलेश आजगे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्या संजीवनी शिसोदे, भाजप महिला मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख जयश्री अहिरराव, डॉ. माधुरी बोरसे, अल्फा अग्रवाल, कविता क्षीरसागर, मायादेवी परदेशी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, वैशाली शिरसाट यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सर्व पक्षांचे जिल्हा, तालुका पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकदिलाने, एकविचाराने काम करूया : डॉ. भामरे
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की आज देशभरात विरोधकांतर्फे पंतप्रधान मोदी तसेच महायुतीची सरकारे असलेल्या राज्य सरकारांविरोधात ठरवून एक प्रपोगंडा चालविला जात आहे. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील गेल्या ७० वर्षांमध्ये झालेला कारभार आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील गेल्या १० वर्षांतील सरकारचा कारभार यात जमीन आस्मानचा फरक जाणवतो. गेल्या दहा वर्षांत आपल्या राष्ट्राचे नेतृत्व करताना मोदी यांनी जागतिक पातळीवर देशाचे महत्त्व उच्च पातळीवर पोहोचवले आहे. देशावरच नव्हे तर जागतिक संकटांतही पंतप्रधान मोदी यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले. करोना काळात भारतातील १४० कोटी जनतेचे केलेले मोफत लसीकरण असेल, की युक्रेन-रशिया युद्धादरम्यान भारतीय विद्यार्थ्यांना परत भारतात आणण्याची मोहीम असो, किंवा चीनचे डोकलामसारखे भारतावर झालेले आक्रमण असेल, अशा प्रत्येक संकटात पंतप्रधान मोदी यांनी कूटनीतीचा वापर करत भारताची मान उंचावत नेली. एवढेच नव्हे तर भारत बदल रहा है, याची प्रचीती दिली. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या १०० वर्षांत विकसित राष्ट्र बनविण्याचा जो संकल्प केला आहे, त्या संकल्पपूर्तीसाठी आपण प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे. हा संकल्प तडीस नेण्यासाठीच आज हा महायुतीचा मेळावा होत आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी आपल्या महायुतीच्या नेत्यांनी ही जबाबदारी आपल्यावर सोपविली आहे. ही जबाबदारी आपण आपल्यातील सर्व मतभेद, हेवेदावे दूर करून एकाच विचाराने प्रेरित होऊन पार पाडू या, असे आवाहनही खासदार डॉ. भामरे यांनी केले.
देशाची प्रगती हेच आपले ध्येय : आ. जयकुमार रावल
आमदार जयकुमार रावल म्हणाले, की महाविजय संकल्प मेळाव्याची सुरवात मनोमीलनाच्या माध्यमातून होत आहे. अनेक वर्षांपासून आपापल्या राजकीय पक्षांचे काम आपण करतो आहोत. मात्र, जेव्हा देशाचा विषय येतो, तेव्हा आपापला अभिनिवेश बाजूला ठेवून आपणही देशासाठी एकत्र येत असतो. एका बाजूला प्रथम देशाच्या हिताचा विचार करणारे आपण सर्व आहोत, तर दुसऱ्या बाजूला स्वतःचा विचार आधी आणि नंतर देश अशी दुसरी बाजू आहे. आणि या दोन विचारांमधील ही लढाई आहे. आपला देश पुढे जाण्याची गरज आहे. देशातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस आर्थिकदृष्ट्या उन्नत झाला पाहिजे. विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे. युवकांना रोजगार मिळाला पाहिजे, अशी विचारधारा असणारे आपले केंद्रातील व राज्यातील सरकार आहे. यामुळे आपणही विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत पोहोचले पाहिजे. त्यासाठी नवा भारत घडविण्याची संकल्पना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटचाल करत आहेत. तीन वेळा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द घडविलेल्या मोदी यांना आता तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपल्या प्रत्येकाला मेहनत करावी लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कारकिर्दीत भारताला जागतिक स्तरावर महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. हा संपूर्ण भारतीयांचा मान आहे. ही सगळी मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाची कमाल आहे.
भारताला आणखी प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी मोदी यांना विराजमान करण्याची गरज आहे. त्यासाठी विकासाचा नारा देत आपण सर्वांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज आहे. या महायुतीच्या माध्यमातून आपण निश्चितच आगामी निवडणुकीत मोठा विजय प्राप्त करू, असा आशावादही आमदार रावल यांनी व्यक्त केला. आज आपण सर्वांनी एकमेकांचा हात हातात घेत आपण एकत्र आहोत, आमचा विचार एक आहे, आमचे ध्येय देशाची प्रगती आहे आणि त्यासाठी पुन्हा पंतप्रधानपदी मोदी यांना विराजमान करायचे आहे, हा संदेश जिल्ह्यातील जनतेला दिला आहे. त्यासाठी महायुतीच्या समन्वयकांसह आपण प्रत्येकाने यापुढे समन्वयाने काम करूया, एकमेकांमधील दुराग्रह दूर करून एकदिलाने काम करूया, असे आवाहनही आमदार रावल यांनी केले.
देशातील प्रत्येक घटकासाठी काम : आ. मंजुळा गावित
आमदार मंजुळा गावित म्हणाल्या, की महाराष्ट्रासह देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. कारण काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील गेल्या ६०- ७० वर्षांतील देशाची वाटचाल आणि पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या १० वर्षांत झालेली देशाची प्रगती यातील अंतर खूप मोठे आहे. आज भारत जागतिक स्तरावर महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यात देशातील महिला, मुले, तरुण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, व्यापारी, उद्योजक अशा प्रत्येक घटकांसाठी विविध योजना राबवत त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे यापुढेही ही वाटचाल कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रित काम करूया, भारताच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करूया, असे आवाहनही आमदार गावित यांनी केले.
आमदार काशिराम पावरा म्हणाले, की २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी एकत्रित काम करून ४५ हून अधिक खासदार निवडून आणण्याचा संकल्प करूया. यासाठी आपल्यातील सर्व मतभेद बाजूला करावे लागतील. यातून पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्याची जबाबदारी पार पाडूया. महाराष्ट्रातही पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.
महायुतीचे भाजपचे समन्वयक अनुप अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे समन्वयक किरण शिंदे, शिवसेनेचे समन्वयक प्रसाद ढोमसे, आरपीआय आठवले गटाचे समन्वयक ॲड. महेंद्र निळे यांनीही मनोगत व्यक्त करत महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी आपसांतील मतभेद, मनभेद दूर सारत एकविचाराने, एकदिलाने काम करण्याची भूमिका मांडली. श्यामकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी आभार मानले.
धुळे–नरडाणा रेल्वेमार्गाचे आठवडाभरात काम : डॉ. भामरेमहायुतीच्या आज झालेल्या मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना खासदार डॉ. भामरे यांनी मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या धुळे ते नरडाणा या रेल्वेमार्गाबाबत खूशखबर दिली. ते म्हणाले, की धुळे ते नरडाणा या पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, आजच ७५० कोटी रुपयांना एका कंपनीला हे काम देण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात रेल्वेमार्गाचे काम सुरू होऊन ते अडीच तीन वर्षांत पूर्णत्वास येऊन धुळे ते नरडाणादरम्यान रेल्वे धावू लागेल. डॉ. भामरेंच्या या घोषणेनंतर उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट करत दाद दिली.