मंत्री गिरीश महाजन निधी वाटपात दुजाभाव करतात!
धुळे : जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे धुळे शहरातील अल्पसंख्यांक भागासाठी विकास निधी वाटपात दुजाभाव करीत असल्याचा गंभीर आरोप धुळे शहराचे आमदार फारुक शहा यांनी केला. मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बुधवारी झालेल्या बैठकीत आमदारांनी व्यथा मांडली.
धुळे शहराचा पाणीप्रश्न आणि कचरा संकलनासारख्या महत्त्वाचा विषय असताना देखील बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे-पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, अशी माहिती आमदार फारुख शाह यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
जिल्हा वार्षिक योजनेतून ५० कोटी मंजूर करण्याची मागणी: जिल्हा नियोजन आराखडा संदर्भात वित्त व नियोजन मंत्री ना. अजित पवार यांच्या कार्यालयात विभागीय बैठक झाली. या बैठकीत आ. फारुख शाह यांनी धुळे शहरातील अल्पसंख्यांक भागात आतापर्यंत जिल्हा वार्षिक योजनेतून कुठलीच कामे झालेली नाही म्हणून जिल्हा वार्षिक योजनेतून अल्पसंख्यांक विभागात रस्ते, गटारी, पथदिवे आणि मोकळ्या जागांना कुंपण भिंत बांधण्यासाठी 50 कोटी आणि ८० फुटी रस्त्यासाठी १५ कोटीच्या निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी केली.
बुधवार रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हा नियोजन बाबत आढावा बैठक झाली. या बैठकीत आ. फारुख शाह यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सापत्न वागणूकीवर कोरडे ओढले. पालकमंत्री धुळे शहरातील अल्पसंख्यांक भागाच्या विकासासाठी निधी देताना दूजाभाव करतात. गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांक भाग विकासापासून वंचित आहे. रस्ते, गटारी, पथदिवे, कुंपण भिंत, पाण्याची पाइपलाइन टाकणे यासारख्या मूलभूत सुविधा देखील मिळणे दुरापास्त आहे. म्हणून जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा अंतिम करताना अल्पसंख्यांक भागाच्या विकासाठी ५० कोटी आणि ८० फुटी रस्त्यासाठी १५ कोटीच्या मंजूर करण्यात यावे. तसेच या बैठकीत धुळे शहरातील पाणीप्रश्न, कचरा संकलन यासंदर्भात धुळे अपयशी ठरलेल्या मनपाच्या कारभाराचे वाभाडे आ. फारुख शाह यांनी काढले. याची दखल घेवून बैठकीस अनुपस्थित पालिका आयुक्त यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यास आदेशित केले.
ना. गुलाबराव पाटील, ना.अनिल पाटील, आ. विजय सावकारे, ऊर्जा विभागाचे सचिव सौरभ विजय, वित्त व नियोजन विभागाचे सचिव उपस्थित होते. धुळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता आणि संबंधित अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासकीय इमारत कामाचा शुभारंभ
धुळे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासनाचे काम सुलभ व्हावे म्हणून आ. फारुख शाह यांच्या प्रयत्नाने प्रशासकीय इमारत बांधकामासाठी 10 कोटी 12 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. या कामाचा शुभारंभ आ. फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उद्योजक व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी उपस्थित होते. यावेळेस उद्योजकांनी आ. फारुख शाह यांचे आभार मानले व अपेक्षा केली की, धुळे जिल्ह्यातील उद्योग वाढवण्यासाठी धुळे जिल्ह्यात एक सेमिनार घेण्यात यावा. त्यामुळे उद्योजकांना चालना मिळेल व देशभरातील उद्योगपती आपले उद्योग लावण्यासाठी पुढे येतील.
शुभारंभ प्रसंगी आ. फारुख शाह यांचेसोबत भिखन शाह, डॉ. दिपश्री नाईक, निजाम सय्यद, इकबाल शाह, डॉ. बापुराव पवार, आसिफ शाह, हारूण खाटीक, सउद आलम, सलमान खान, रियाज शाह, समीर शाह, फैसल अन्सारी आदी उपस्थित होते.
धुळे औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात विकसित होत असून, नरडाणा औद्योगिक वसाहतसुद्धा चांगल्या प्रकारे विकसित होत आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी त्यांना नाशिक व जळगाव येथे जावे लागत होते. ही समस्या धुळे जिल्ह्यातील उद्योजकांनी आ. फारुख शाह यांच्याकडे मांडली. त्यांच्या या निवेदनाचा विचार करता आ. फारुख शाह यांनी उद्योगमंत्री सावंत यांच्याकडे मागणी केली व यासाठी दोन वर्ष पाठपुरावा केला. या मागणीचा विचार करता उद्योग मंत्र्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने धुळे औद्योगिक वसाहतीत प्रशासकीय इमारतीसाठी 10 कोटी 12 लक्ष रुपये मंजूर केले.
या भव्य इमारतीत उद्योजकांचे व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे काम सुलभ होणार असून आता उद्योजकांना जळगाव, नाशिक, मुंबई येथे न जाता धुळे येथेच आपले काम मांडावे लागतील. यामुळे उद्योजकांना होणारा त्रास वाचणार आहे.
यापूर्वी आ. फारुख शाह यांच्या प्रयत्नानेधुळे औद्योगिक वसाहतीसाठी सुसज्ज अग्निशमन केंद्र उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून, औद्योगिक वसाहतीचा पाण्याचा प्रश्न देखील ३७ कोटी रुपयांची हरण्यामाळ पाणीपुरवठा योजना मंजूर करून निकाली काढला आहे.