पर्यावरण विघातक मांजा विक्री करणाऱ्यांवर संक्रांत, शिरपूर पोलिसांची कारवाई
शिरपूर : शासनाने बंदी घातली असताना पर्यावरण विघातक नायलॉन मांजा तयार करून त्याची विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर साठा करणाऱ्या व्यावसायिकाच्या दुकानावर छापा टाकून शिरपूर पोलिसांनी संक्रांत सणाच्या पूर्वसंध्येला महत्त्वाची कारवाई केली.
ही घटना आहे 14 जानेवारी सायंकाळी सहा वाजेची. शिरपूर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. शहरातील वड गल्लीतील महावीर प्रोव्हीजन दुकानात हरीश हंसराज जैन (रा. रथ गल्ली, वरचे गाव, शिरपूर) हा त्याच्या दुकानात संक्रांत सणाच्या दिवसात पतंग उडवण्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजाची चोरटी विक्री करीत आहे. त्यावर शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, संदीप दरवडे तसेच शोध पथकाचे अंमलदार व दोन पंच अशांनी शिरपूर छापा टाकला.
शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास बंदी घातलेली असताना सुद्धा तो स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून एकूण 30 हजार 180 रुपये किमतीचा मांजा मालाची चोरटी विक्री करण्यासाठी कब्जात बाळगताना मिळून आला. त्याला मालासह ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून पर्यावरण कायदा सण 1986 चे कलम 5, 15 सह भादंवी कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, संदीप दरवडे व शोध पथकाचे हेड कॉन्स्टेबल ललित पाटील, रवींद्र आखडमल, पोलीस कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, प्रशांत पवार, आरिफ तडवी, भटू साळुंखे, विनोद अआखडमल, मनोज महाजन, सचिन वाघ, मनोज दाभाडे, गोविंद कोळी, चालक पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्या पथकाने केली.
शिरपूर पोलिसांचा इशारा : शासनाने संक्रांत सणाच्या कालावधीत पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास बंदी घातली आहे. कोणीही पतंग उडविण्यासाठी मांजा मालाचा गैर कायदेशीररित्या वापर करू नये. जर कोणी पतंग उडवण्यासाठी मांजा मालाची चोरटी विक्री करीत असल्याचे अगर त्याचा बेकायदेशीररित्या वापर करीत असल्याचे माहीत झाल्यास त्याच्यावर पर्यावरण कायदा सन 1986 चे कलम 5, 15 सह भादंवी कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.