कल्याणीताई अंपळकरांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा!
धुळे : शहराच्या माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर आणि सुलोचना देवीसिंग राजपूत यांच्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या संशयितांना त्वरित अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मंगळवारी केली.
आरपीआय महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा बुद्धप्रिया धोंडीराम पगारे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी मंगळवारी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, माजी उपमहापौर कल्याणीताई अंपळकर आणि सुलोचना राजपूत यांच्यावर 10 जानेवारी रोजी सशस्त्र जमावाने हल्ला केला. लाठ्या-काठ्या आणि कोयते घेऊन भर वस्तीत हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कल्याणीताई अंपळकर यांची सोनपत लांबविण्यात आली. तसेच त्यांच्या गाडीचे देखील नुकसान करण्यात आले. या घटनेमुळे धुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. माजी उपमहापौरांसारख्या उच्च पदस्थ महिलेवर भर वस्तीमध्ये हल्ला झाल्याच्या घटनेमुळे शहरातील महिलांना असुरक्षित वाटू लागले आहे. त्यामुळे हल्लेखोरांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. तसेच निवेदनात संशयितांची नावे देखील दिली आहेत. त्यात परशुराम परदेशी, छोटीबाई परदेशी, भूमीम परदेशी, कुणाल परदेशी, उदय परदेशी, रोहित थोरात, बॉबी खैरनार, रिक्षाचालक आबा, रिक्षाचालक संजय, रिक्षाचालक दिनेश यांचा समावेश आहे.
निवेदन देताना कमल संदीप शिंदे, सुशीला सोनवणे, लक्ष्मी गायकवाड, सुकू सोनवणे, कामिनी सोनवणे, शकुंतला मालचे, सुकू दावलकर, रंगू महाजन, संधू पवार, रीना पवार, वंदना सोनवणे, आशा पाटील, स्मिताली पवार या महिला उपस्थित होत्या.