कर्तुत्व कुशल व आश्वासक नेतृत्व : आमदार जयकुमार रावल
आपला नेता कर्तृत्व कुशल व आश्वासक असावा, अशी जनतेची अपेक्षा असते. ती अपेक्षा तितकीच खरी आहे. कारण नेतृत्वाकडे कर्तुत्व कुशलता, परिश्रमाची वृत्ती, समर्पणाची शक्ती आणि आपण नेतृत्व करत असलेल्या क्षेत्रात निर्माण झालेल्या, भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्नांना सोडवण्याची दूरदृष्टी व त्या अनुषंगाने विकासाचे सुव्यवस्थित नियोजन असेल तर शाश्वत विकासाची प्रक्रिया कशी गतिमान होते? मतदार संघाच्या दुष्काळ मुक्तीसहित वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न कसे सुटतात? याचं राज्यातील उत्तम उदाहरण म्हणजे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार जयकुमारभाऊ रावल. त्यांच्या रूपाने मतदार संघाला दूरदर्शी व प्रयत्नांची पराकाष्टा करणारं नेतृत्व लाभलं. अशा कर्तृत्वसंपन्न लोकनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेला प्रचंड संघर्ष आणि त्यातून झालेला विकासरुपी उत्कर्ष मांडण्याचा अल्प प्रयत्न…
आज शिंदखेडा मतदारसंघात सिंचन, शिक्षण, उद्योग, कृषी, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा विकास, हायब्रीड ॲम्युनिटीच्या माध्यमातून कोट्यावधींचे रस्ते, वॉटर ग्रीड आणि राष्ट्रीय पेयजल योजनेतून प्रत्येक गावात पिण्यासाठी शुद्ध पाणी, शासकीय इमारती, व्यक्तिगत लाभाच्या योजना, सिंचन विहिरींच्या माध्यमातून सिंचन क्षमतेत वाढ, या सर्व क्षेत्रात दमदार विकास दिसतोय. सिंचन प्रकल्प साकारता आहेत. प्रकाशा-बुराई योजनेला 850 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळते. हे सर्व सहज, अल्प कालावधीत घडलेली प्रक्रिया नाही. त्याकरिता आमदार जयकुमार रावल यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. सन 2004 मध्ये शहादा-दोंडाईचा मतदार संघातून राज्यमंत्र्याचा पराभव करत आमदार रावल यांनी या भागातील भारतीय जनता पक्षाचा पहिला आमदार म्हणून विधानसभेत पाय ठेवला. या संधीतून वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्नांना निकाली काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले. मतदार संघाच्या बरोबरच जिल्ह्याचे मुलत: काय प्रश्न आहेत? याची आधीच जाण होती. म्हणूनच मोठा उद्योग सोडून त्यांनी राष्ट्र समर्पित असलेल्या भाजपच्या माध्यमातून राजकारणात येण्याचा निर्णय घेतला.
मतदार संघाच्या शेतीपासून ते उद्योगापर्यंत, पिण्याच्या पाण्यापासून ते शेतीला बारमाही पाणी आणि दुष्काळ मुक्तीपर्यंत, शिक्षणापासून तर रोजगाराच्या संधीपर्यंत, आरोग्य सुविधेपासून ते सामाजिक न्यायापर्यंत, महामार्गापासून ते गावांना जोडणाऱ्या चांगल्या रस्त्यांपर्यंत, सगळ्याच प्रश्नांचा अभ्यास केला आणि त्या सोडविण्याच्या दृष्टीने नियोजन केले. खरंतर विकासाचा अनुशेष मोठा होता. राज्यात आपले सरकार नसल्याने अनेक अडचणी होत्या. आपल्या उत्कृष्ट संवादातून स्थानिक प्रश्नांना विधानसभेत मांडले. राज्य आणि केंद्र पातळीवरील नेतृत्वाकडेही त्यासाठी पाठपुरावा केला. अमरावती मध्यम प्रकल्प आणि सारंगखेडा बॅरेजसाठी निधी मिळावा म्हणून मोठा संघर्ष केला. पहिल्याच अधिवेशनात मोठा निधी मिळून प्रकल्प पूर्णत्वास नेले.
यासोबतच आमदार रावल यांनी पक्ष वाढीलाही बळ दिले. धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पक्षाचा एकटाच आमदार, विरोधी पक्षाचे सरकार, अनेक राजकीय अडचणी निर्माण करणाऱ्यांची संख्याही जास्त, तरीही पूर्ण ताकतीने स्व. गोपीनाथराव मुंडे, स्व. प्रमोद महाजन या तत्कालीन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेऊन भाजपाची वेगाने वाढ केली. विकासाला साथ देणाऱ्या तरुण आणि अनुभवी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौज उभी केली. त्यांच्या अंगी लहानपणापासूनच नेतृत्व गुण होते. त्यांच्यात दादासाहेबांचा समर्पित वारसा आला. आपल्या राजकीय कौशल्याने धुळे महापालिकेत भाजपचे फक्त तीन नगरसेवक असताना मंजुळाताई गावीत त्यांच्या रूपाने पहिली महिला महापौर बसविण्याचे राजकीय कर्तृत्व केले. अशीच राजकीय गणितं जुळवत पक्षाचे संघटन वाढविले. जिल्ह्यातील जवळपास सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपंचायत, नगरपालिका, दूध उत्पादक संघ, सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती आदींवर विजय मिळवून भाजपचा झेंडा रोवला.
दरम्यान, सन 2014 मध्ये राज्यात व केंद्रात सरकार आलं. सन 2016 नंतर जयकुमार रावल यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यानंतर जलयुक्त शिवार व विविध योजनांच्या माध्यमातून 500 ते 600 वन बंधारे बांधले, सुलवाडे-जामफळ सारखी मोठी योजना सुरू करण्यात यश आले. बुराई बारमाही करण्यासाठी प्रकाशा-बुराई योजनेला चालना दिली. नंतरच्या काळात निधीअभावी योजना थांबली. यासाठी प्रयत्नांची शर्त करून शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी या हिवाळी अधिवेशनात 850 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी कार्यवाही करू असे सांगितले. लवकरच हे काम सुरू होणार आहे. सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी बुराई नदीवर ठिकठिकाणी 34 बंधाऱ्यांसाठी 21 कोटींचा निधी मंजूर केला. हे काम प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी रणरणत्या उन्हात बळसाणेपासून ते वरसुसपर्यंत 54 किलोमीटर अंतर चार दिवसात नदीतून पायी चालत बुराई नदी परिक्रमा केली. पाच हजारापेक्षा जास्त सिंचन विहिरी निर्माण केल्या.
महाराष्ट्रातील पर्यटन आपल्या अभ्यासपूर्ण नियोजनातून जगाच्या पर्यटन नकाशावर आणले. वर्णेश्वर महादेव, गांगेश्वर, पेडकाई माता, आशापुरी माता मंदिर अशा मतदारसंघातील अनेक धार्मिक स्थळांचा विकास केला. गावांतर्गत सुविधा विकास करत असताना प्रशस्त रस्त्यांचे जाळे निर्माण केले. बेटावद-शिंदखेडा-दोंडाईचा सारखे कोट्यवधींचे अनेक रस्ते मतदारसंघात निर्माण केले. राष्ट्रीय पेयजल योजना, वॉटर ग्रीड योजनेतून अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकाली काढला. दोंडाईचा नगरपालिकेची इमारत, शिंदखेडा तहसील कार्यालय, पंचायत समिती इमारत, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीसह अनेक शासकीय इमारती उभ्या केल्या. ग्रामीण भागात काम करताना जनतेच्या अनेक समस्या असतात; त्या पूर्ण करताना लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी पूर्ण करण्याचे काम आमदार रावल यांनी केले. आज मतदारसंघात दुष्काळमुक्तीबरोबरच सर्वच क्षेत्रात पूर्ण क्षमतेने गतिमान विकास होतोय. रात्रंदिवस मतदार संघाला कुटुंब म्हणून जनतेच्या विकासाचे चिंतन करणाऱ्या, जनतेला प्रश्न पडण्याआधीच ते शोधून त्या अनुषंगाने योजनाबद्ध पद्धतीने काम करणाऱ्या या लोकनेत्यास त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…
-विश्वनाथ साबळे