छत्तीसगडमधील हसदेव जंगल वाचविण्यासाठी आदिवासी काँग्रेस मैदानात
धुळे : देशातील मोठे भांडवलदार गौतम अदानी यांच्या कोळसा खाणीसाठी हसदेव जंगल नष्ट केले जात आहे. छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगल वाचविण्यासाठी स्थानिक आदिवासींनी गेल्या महिनाभरापासून आंदोलन तीव्र केले आहे.
दरम्यान, हे वनक्षेत्र वाचविण्यासाठी काॅंग्रेस पक्षदेखील मैदानात उतरला आहे. आदिवासी काॅंग्रेसतर्फे देशभरातून विरोध सुरू झाला आहे. महाराष्ट्रातही आदिवासी काॅंग्रेसने राज्यभर निदर्शने केली. दोन दिवसात जंगलतोड थांबवली नाही तर देशभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या धुळे जिल्हा आघाडीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाचे राष्ट्रपती आणि महाराष्ट्राचे राज्यपाल यांना बुधवारी निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, छत्तीसगड राज्यातील सरगुना जिल्ह्यातील उदयपूर परिसरात घाटबऱ्याचे पेट्रोमार जंगल हे आदिवासींचे देवस्थान असलेल्या हसदेव जंगलाचा परिसर आहे. भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीनुसार जैवविविधता असलेले जंगल नष्ट करता येत नाही. परंतु या जंगलात कोळसा मुबलक प्रमाणात असल्यामुळे जंगलातील 92 हेक्टर क्षेत्रात उद्योजक गौतम अदानी यांना कोळसा उत्खननासाठी छत्तीसगड सरकारने बेकायदेशीररित्या परवानगी दिल्याचा आरोप स्थानिक आदिवासींनी केला आहे. त्यासाठी 450 पेक्षा अधिक जवान हसदेव जंगलात तैनात करून बळाचा वापर करीत यंत्राद्वारे जंगलतोड केली जात आहे. ही जंगलतोड त्वरित थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसने केली आहे. तसेच अवैध वृक्षतोडीचा निषेधही केला आहे. जंगलतोड त्वरित न थांबविल्यास देशभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
निवेदन देताना धुळे जिल्हा आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष दीपक अहिरे, नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे एलडीएम समन्वयक तथा काँग्रेसचे साक्री तालुकाध्यक्ष भानुदास गांगुर्डे, आदिवासी काँग्रेसचे धुळे शहराध्यक्ष विजय मोरे, तालुका अध्यक्ष बापू ठाकरे, धुळे ग्रामीण अध्यक्ष एकनाथ ठाकरे, सुनील सोनवणे, राजेश शांताराम सोनवणे आदी उपस्थित होते.