विनोद वाईन शॉप हटवा, तो वाहन कायदा रद्द करा, अत्याचारांना फाशी द्या!
धुळे : विनोद वाईन शॉप हटवावे, नवीन वाहन कायदा रद्द करावा, लहान मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करीत ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.
नवीन वाहन कायदा रद्द करा : नव्या मोटार वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील चालकांमध्ये मोठा संताप आहे. बेरोजगार, भूमिहीन, शोषीत, दलित बहुतांश गरीब असलेले ड्रायव्हर लाईनमध्ये आलेले आहेत. त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. सहा-सहा महिने ते कुटुंबाला सुध्दा भेटत नाहीत. त्यांची साधी कामगार म्हणून नोंद सुध्दा नाही. त्या कामगारांना वेतन धोरण सुध्दा लागू नाही. कुणी पाच तर कुणी सहा-सात हजार रुपयात महिनाभर काम करीत आहेत. अशा वेळी सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षे शिक्षा जर नव्या कायद्यानुसार मिळणार असेल तर त्याला घटना घडताच स्वतःला संपवून घ्यावे लागणार आहे. नवा कायदा हा जाचक आहे. भयभीत करणारा आहे. त्या विरोधात चालक वर्ग रस्त्यावर उतरलेला आहे. नवीन वाहन कायदा रद्द करण्यात यावा व वाहन चालकांना सरकारी दरमहा भत्ता देण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे.
अत्याचारींना फाशीची शिक्षा द्या : मानवतेला काळीमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यात रोहा पिंपळगांव येथे घडली. एका सहा वर्षाच्या मराठा समाजाच्या चिमुकलीचे अपहरण करुन तिला मारुन टाकण्यात आले. 22 तास मुलगी बेपत्ता होती. 19 किलोमीटर अंतरावर तिचा मृतदेह आढळून आला. आरोपी अद्यापही फरार आहेत. ऑल इंडिया पँथर सेना तीव्र शब्दात घटनेचा निषेध करीत आहे. पोलिसांना 22 तासात मुलगी सापडली नाही. पोलिसांनी तात्काळ भूमिका घेऊन कारवाई केली असती तर ती चिमुरडी गेली नसती. राज्यात पोलिसांची भिती राहिलेली नाही. संबंधीत पोलीस अधिकारी यांना निलंबित करावे. गुन्ह्याचा तपास सीआयडीमार्फत करावा, आरोपींना अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.
विनोद वाईन शॉप हटवा : धुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले विनोद वाईन शॉप हे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. हे वाईनशॉप तात्काळ स्थलांतरीत करावे. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला प्रशासन जबाबदार असेल. या सर्व विषयाचे मुद्दे मार्गी लावण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन ऑल इंडिया पँथर सेनेकडून करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सागर मोहीते, मायाताई पानपाटील, सुनिताताई गोपाळ, अनिताताई सोनवणे, वैशाली निकम, भाऊसाहेब बळसाणे, आनंद अमृतसागर, आकाश घोडे, गोरख अहिरे, सुरज पाईकराव, निलेश इंदवे, सुलक्षणा वाघ आदी उपस्थित होते.