धुळे ग्रामीणमधील मांडळ, नंदाळे, अंचाळे, मोरदडला संकल्प यात्रा
धुळे : धुळे ग्रामीण मतदारसंघातील बोरी नदी पट्ट्यातील काही गावांचा अपवाद वगळता शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. वर्षानुवर्षे असलेली ही परिस्थिती बदलण्यासाठीच आपण लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघांतील सिंचनाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले. यातूनच धुळे व शिंदखेडा तालुक्यांसाठी वरदान ठरणारी सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिचन योजना पूर्णत्वास येत आहे. वर्षभरातानंतर या योजनेद्वारे धुळे तालुक्यातील १०० व शिंदखेडा तालुक्यातील १०० अशा २०० गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सुटणार असून, शेतकऱ्यांचे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहण्याचे दिवस संपणार आहेत. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना बारमाही तापी नदीचे पाणी उपलब्ध होणार असून, तालुका सुजलाम-सुफलाम होईल, अशी ग्वाही खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याच्या अनुषंगाने देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचे धुळे तालुक्यातील मांडळ, नंदाळे, अंचाळे, मोरदड या बोरी पट्ट्यातील गावांत स्वागत झाले, त्यावेळी खासदार डॉ. भामरे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते या गावांतील लाभांपासून वंचित लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला. डॉ. भामरे म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात गोरगरिबांसह समाजातील विविध घटकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासह त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध ७२ योजना राबविण्यात आल्या, येत आहेत. या योजनांतून वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणतानाच भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्याच बरोबर खासदार म्हणून तुमचे प्रतिनिधित्व करताना आपणही लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव शहर, मालेगाव ग्रामीण व बागलाण या सहाही मतदारसंघांतील गावागावांतील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोट्यवधींचा निधी देत कामे मार्गी लावली आहेत. त्याच प्रमाणे धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी बारमाही पाणी मिळावे म्हणून अनेक दशकांपासून प्रलंबित सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी पाठपुरावा केला. पंतप्रधान मोदी यांच्याकडून योजनेसाठी विशेष पॅकेजअंतर्गत २५०० कोटी रुपयांचा निधी आणून काम सुरू केले. तीन वर्षांपासून हे काम सुरू असून, ते ७० टक्क्यांपर्यंत झाले आहे. वर्ष-दीड वर्षात प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत जामफळ धरणातून तापीचे पाणी पोहोचल आणि तालुका सुजलाम-सुफलाम होईल.
उद्योगांची लवकरच भरभराट : खासदार डॉ. भामरे म्हणाले, की उद्योग-व्यवसायांसाठी आवश्यक महामार्ग, रेल्वे आणि मुबलक पाण्यासारख्या मूलभूत सोयी-सुविधांची पूर्ती करण्यात तुमचा खासदार म्हणून यश आले आहे. जिल्ह्यातून पाच राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झाले असून, धुळे-नरडाणा रेल्वेमार्गाचे कामही आठवडाभरात सुरू होत आहे. तसेच जामफळ धरणाचे कामही वर्षभरात पूर्ण होणार असल्याने येत्या दोन-तीन वर्षांत धुळे शहर व नरडाणा औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक उद्योगांची भरभराट होणार असून, यातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांच्या हातांनाही काम उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
वंचित ग्रामस्थांना योजनांचा लाभ : मांडळ येथे झालेल्या कार्यक्रमात सरपंच नयना पाटील, प्रा. प्रवीण पाटील, उपसरपंच खंडू पवार, वाल्मीक पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, विकसित भारत संकल्प यात्रेचे संयोजक हरीश शेलार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. नंदाळे येथे झालेल्या कार्यक्रमास सरपंच योगेश पाटील, उपसरपंच भावडू सोनवणे, शिवाजी पाटील, विजय पाटील, भिकन पाटील, संजय पाटील, धनराज पाटील, नानासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्या माधुरी पाटील, भावना वाघ, भानुदास पाटील, दत्तात्रय पाटील, निलेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंचाळे येथे झालेल्या कार्यक्रमास सरपंच मोहन मोरे, उपसरपंच गणेश जैन, विकास सोसायटीचे अध्यक्ष चुनीलाल पाटील, माजी सरपंच योगेश साळुंके, मनोहर पाटील, धनराज पाटील, शिवाजी पाटील, किशोर मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. मोरदड येथे झालेल्या कार्यक्रमास खासदार डॉ. भामरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील, यात्रेचे संयोजक हरीश शेलार, पंचायत समिती सदस्य भय्यासाहेब पाटील, सरपंच कल्पनाबाई मराठे, उपसरपंच गोविंद पाटील, खोरदडचे उपसरपंच शरद पाटील, नगराज पाटील, दगाजी पाटील, झुलाल भिल यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या चारही गावांतील वंचित लाभार्थ्यांना आयुष्यमान भारतच्या कार्डसह विविध योजनांचा लाभ देण्यात आला.