बाबासाहेबांच्या स्मारकाजवळील दारू दुकानाचा बोर्ड फोडला!
धुळे : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाशेजारी असलेले वादग्रस्त दारू दुकान हटविण्यासाठी 18 जानेवारी रोजी तीव्र आंदोलन झाले. दुकान फोडण्याचा इशारा आधीच दिला होता. त्यामुळे दुकान मालकाने दुकान बंद ठेवले होते. आंदोलकांनी दुकानाचा बोर्ड फोडला. याप्रकरणी आजाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लाेंढे यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध शहर पाेलिसात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दिवसभरात नेमकं काय घडलं? : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा अनधिकृत असल्याचे सांगणाऱ्या विनोद वाइन शॉपचे मालक गलानी यांच्याविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करावा, तसेच हे शाॅप हटविण्यात यावे, या मागणीसाठी आजाद समाज पार्टीच्या वतीने गुरुवारी आंदाेलन करण्यात आले. यावेळी संतप्त आंदाेलनकर्त्यांनी संबंधित दुकानाचा बाेर्ड फाेडल्याने आंदोलनाला गालबाेट लागले. दरम्यान, आता आम्ही या दुकानाचा बोर्ड फोडला. येत्या पाच दिवसांच्या आत हे दुकान येथून हटवा अन्यथा दुकान ज्या दिवशी चालू राहील, त्या दिवशी फोडले जाईल. हे दुकान हटविले नाही तर पालकमंत्र्यांना २६ जानेवारीला झेंडावंदन करू देणार नाही, सामूहिक आत्मदहन करू असा इशारा लोंढे यांनी दिला आहे. आंदोलन नियोजित असल्याने आधीच पोलिस बंदोबस्त तैनात हाेता. आंदाेलनात आजाद समाज पार्टी व समविचारी पक्षाचे तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी हाेते. यावेळी आंदोलकांपैकी काहींनी काठ्यांनी दुकानाचे बोर्ड फोडले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना आनंद लोंढे म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय संघटनांमधील आंबेडकर अनुयायींनी बाबासाहेबांच्या पुतळ्यामागील हे दारू दुकान हटविण्यासंदर्भात निवेदन दिले, आंदोलने केली. मात्र, हे दुकान अद्यापही हटलेले नाही. शॉपचे मालक मात्र डॉ. आंबेडकर यांचा पुतळाच बेकायदेशीर ठरवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रशासनाने ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करावा. आज आम्ही दुकानाचे बोर्ड फोडले आहे. येत्या पाच दिवसात दुकान येथून हलवावे. या पाच दिवसांत दुकान केव्हाही चालू दिसले, तर आम्ही दुकान फोडू, अशी घोषणा केली. यानंतर आंदाेलक आपला माेर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने वळवीत असताना पोलिसांनी अडविले व ताब्यात घेतले. यानंतर पाेलिस ठाण्यात एकच गर्दी झाली.
आंदाेलनकर्ते अटकेत : डाॅ. बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे असलेल्या वाइन शाॅपच्या पाटीची तोडफोड केल्याप्रकरणी आनंद लोंढे, संतोष अमृतसागर, रवींद्र वाघ, दावल वाघ, विजय सावकारे, रत्नशील सोनवणे यांना अटक करण्यात आली. हवालदार जावेद शेख यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४२७, क्रिमिनल अमाइंडमेंट ॲक्ट १९३२चे कलम ७, सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३ आणि ४ तसेच पोलिस कायदा कलम ३७ (१)(३)चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक शरद लेंढे करीत आहेत.
23 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी : बाबासाहेबांच्या स्मारकाशेजारी असलेल्या दारू दुकानाला आंबेडकरी समाजाचा वाढता विरोध लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या दालनात 23 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या सुनाणीला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दारू दुकानाच्या मालकाला हजर राहण्याची नोटीस प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे दुकान फोडण्याची टोकाची भुमिका न घेता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या सूचना आंदोलकांना आधीच दिल्या होत्या. असे असताना त्यांनी तोडफोड केल्यामुळे गुन्हे दाखल केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, 23 तारखेला जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.