डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धुळे येथील ऐतिहासिक भेट
भारतरत्न, विश्वभुषण, भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधीसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी चळवळीत पूर्व खान्देश (जळगाव) आणि पच्छिम खान्देश (धुळे, नंदुरबार) यांचे आंबेडकरी चळवळीत महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. पूर्व खान्देशने तर राजकीय भरारी घेतली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाल्यानंतर, विलायतेहुन विविध विषयांच्या पदव्या घेऊन आल्यानंतर नोकरी न करण्याचा निर्धार केला. “नोकरी करून मी माझ्या समाजाचा उद्धार करू शकत नाही”, असा विचार त्यांनी केला आणि वकीली करण्यास सुरुवात केली. कारण बडोदा नरेश श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात नोकरी दिली असता, तेथे बाबासाहेबांना जातीयतेचे चटके सोसावे लागले होते. म्हणून त्यांनी नोकरी न करता वकिली सुरु केली आणि त्या उत्पन्नातून परिवाराचा उदरनिर्वाह भागविला. वकिलीसोबतच सामाजिक कार्यदेखील करता येत होते. प्रारंभीच्या काळात बाबासाहेबांनी मुंबई इलाखा, खान्देश, नाशिक आणि नंतरच्या काळात, वराड प्रांत, निजाम इस्टेट या भागात वकीली केली. १९२९-३० च्या काळात त्यांनी नासिक, पूर्व खान्देश (जळगाव), पश्चिम खान्देश (धुळे) या जिल्ह्यातील केसेस घेण्यास सुरुवात केली. मुंबई बाहेर केसेसकरिता बोलावणे आले म्हणजे फी देखील समाधानकारक मिळत असे. याच काळात पश्चिम खान्देश (धुळे) जिल्ह्यातील नावाजलेले वकील प्रेमसिंग आनंदसिंग पाटील (तवर) वकील यांनी बॅरिस्टर डॉ. बी. आर. आंबेडकरांना एका केसच्या कामासाठी धुळे कोर्टात बोलाविले.
शिरपूर तालुक्याच्या वाघाडी गावात हुलेसिंग मोतीराम जहागीरदार-पाटील आणि मगन मथुरादास वाणी व अन्य १४ लोक यांच्यात पोळा सणाच्या वेळेस कुणाचे बैल मिरवणुकीत पुढे राहावे यावरून वाद निर्माण झाला. हुलेसिंग मोतीराम पाटील (पवार, जहागीरदार) रा. वाघाडी ता. शिरपूर यांनी दि. २७/७/१९३६ रोजी अर्ज केला की, माझ्या गावाला पोळा सणानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत माझे बैल सर्वात पुढे ठेवण्याबाबत अर्ज दाखल केला. सदर अर्ज निकाली काढण्यासाठी प्रांत अधिकारी (ई. डी.) यांच्याकडे सोपविण्यात आला. परंतु तो अर्ज दि. २९/७/१९३६ रोजी प्रांत अधिकारी यांनी नामंजूर केला होता. त्यामुळे अर्जदार हुलेसिंग मोतीराम पाटील (पवार जहागीरदार) यांनी जिल्हा न्यायदंडाधिकारी साहेब पच्छिम खान्देश (धुळे) यांच्याकडे अर्ज केला. त्या अर्जाच्या सुनावणीकरिता
अर्जदाराचे वकील पी. ए. पाटील (तंवर) वकील व सी. एम. सुळे वकील यांनी बरिस्टर डॉ. बी. आर. आंबेडकर यांना धुळे येथे कोर्टाचे कामकाज करण्यासाठी आमंत्रित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धुळे येथे येणार अशी वार्ता तवर वकील यांच्याकडून आंबेडकरी चळवळीचे आग्रही कार्यकर्ते समतावादी दलित मंडळाचे कार्यकर्ते तसेच प्राणयज्ञ दलाचे कार्यकर्ते यांना कळल्यावर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. बाबासाहेब आंबेडकर आपल्या गावात येणार ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. मानवमुक्ती संग्रामचा महानायक आमचा मुक्तीदाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर धुळ्यात कोर्टाच्या कामासाठी येणार याचा मनस्वी आनंद अस्पृश्य स्त्री-पुरुषांना झाला होता.
अखेर दि. ३१ जुलै १९३७ ची ती सुवर्ण पहाट उजाळली. समतावादी दलित मंडळ, प्राणयज्ञ दलाचे कार्यकर्ते सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडत होते. प्रामुख्याने पुनाजीराव लळींगकर, कॅप्टन भिमराव वस्ताद साळुंखे, सखाराम केदार पहेलवान, सुकदेव केदार पहेलवान, देवरामपंत अहिरे, ए. आर. सावंत ही मंडळी धावपळ करत होती. संपूर्ण खान्देशातील खेड्यापाड्यातील गावकुसाबाहेर राहणारा अस्पृश्य समाज हे आपल्या मुक्तीदाताच्या दर्शनाला रात्रीच आपल्या गावाहून निघुन आले होते. रात्रीच्या चार वाजेपासून स्टेशनवर गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. पावसाचे दिवस असल्याने रात्रीची वेळ घालवणे कठीण जात होते. काही तर शेकोटी पेटवून उब मिळवत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास, श्रद्धा व प्रेमापोटी येवढा अफाट जनसमुदाय पहाटेच धुळे रेल्वेस्टेशन वर जमला होता. सकाळी ८.२० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घेऊन येणारी रेल्वे धुळे स्टेशनवर पोहोचली. गाडी स्टेशनवर येताच उपस्थित जनसमुदायाने बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने सारा स्टेशन परिसर दुमदुमून गेला. “बाबासाहब कौन है, दलितों का राजा है”, “आंबेडकर जिंदाबाद, जिंदाबाद”, “बोलो भिम भगवान की जय” अशा प्रेरणादायी घोषणा देऊन बाबासाहेबांप्रती आदर उपस्थित जनसमुदाय व्यक्त करत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विशेष बोगीने आल्यामुळे स्टेशनवर गाडी थांबल्याबरोबर बाबासाहेबांचा त्रिवार प्रचंड जयघोष झाला. आरंभी सर्वश्री. सावंत, ढेगे, बैसाणे, पुनाजीराव लळिंगकर, सखाराम केदार, सुकदेव केदार वगैरे मंडळींनी त्यांची मुलाखत घेतली. समतावादी दलित मंडळाचे सेक्रेटरी तुकाराम पहिलवान यांनी संघातर्फे व सौ. पार्वताबाई अहिरे यांनी चोखामेळा बोर्डिंगतर्फे डॉ. बाबासाहेबांच्या गळ्यात हार घातले. बाबासाहेब लाखोंच्या जनसमुदायाला हास्यवदन करीत दौलत गुलाजी जाधव (एम.एल.ए.), दत्तात्रय मागाडे यांच्यासह जनतेतून वाट काढत पाटील (तंवर) वकील यांनी पाठवलेल्या गाडीत जाऊन बसले. त्यानंतर स्टेशनपासून ट्रॅव्हलर्स बंगलो (आताचे सा.बां. विभागाचे रेस्ट हाऊस क्रमांक २. महात्मा फुले यांचा पुतळ्यासमोर बसस्टॅण्डच्या मागील बाजुस) पर्यंत पाटील वकील यांच्या मोटारीत वाजत-गाजत मिरवणुक काढण्यात आली. सदरवेळी आंबेडकर चौक, लळींग, अवधान, नरव्हाळ, जुने धुळे, मिल येथील स्काऊटने उत्तम प्रकारे शिस्त ठेवली होती.
सदर मिरवणुक बंगल्याजवळ येवून थांबली असता तेथेही मोठा जनसमुदाय जमला होता. त्यात काही लळींग येथील मोळी विकणाऱ्या स्त्रीया देखील बाबासाहेबांच्या दर्शनाला आल्या होत्या. बंगल्यातून बाबासाहेबांचे दर्शन झाल्याशिवाय अस्पृश्य स्त्री-पुरुष, आबालवृद्ध हालेनात. काही वेळाने बाबासाहेब हास्यवंदन करीत बंगल्याच्या बाहेर आले. बाबासाहेब आंबेडकरांचे तेजोमय रूप पाहून उपस्थित जनसमुदाय धन्य झाला.
उपस्थितांनी बाबासाहेबांना विनंती केली की, बाबासाहेब आपण आमचे मुक्तीदाता आहात. आपण आम्हा अस्पृश्यांना उपदेश द्यावा, मार्गदर्शन करावे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, मला आता कोर्टाचे काम आहे. माझे कोर्टाचे काम संपले की आपण मला ज्या ठिकाणी बोलवाल मी त्या ठिकाणी येईल, असे सांगून सर्व लोकांना जाण्यास सांगितले. दुपारी कोर्टाचे काम संपल्यावर ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हरिजन सेवक संघाचे चिटणीस बर्वे वकील यांच्या घरी 4 वाजता श्री. जाधव, श्री. सावंत, श्री. पुनाजी लळींगकर, श्री. तुकाराम पहिलवान, श्री. ढेगे मंडळीचा चहापानाचा कार्यक्रम झाला. त्याप्रसंगी काँग्रेसची बरीच मंडळी हजर होती. बरीच चर्चा झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी हरीजन सेवक संघाने सुरु केलेल्या ‘राजेंद्र हरिजन छात्रालयास’ भेट दिली. त्या ठिकाणी अस्पृश्य समाजाचे बरेच विद्यार्थी शिकत होते. त्यात श्री. पी. टी. बोराळे व अन्य मंडळींनी बाबासाहेब आंबेडकरांचे हार पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. नंतर ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विजयानंद थिएटरमध्ये (स्वस्तिक थियटर) जोरदार भाषण झाले. सभेस इतका मोठा जनसमुदाय जमला होता की कित्येकांना थियटरबाहेर उभे राहून बाबासाहेबांचे भाषण ऐकावे लागले होते. बाबासाहेब सामाजिक कार्यासाठी आले नव्हते ते फक्त एका केस संदर्भात धुळ्यात आले होते. तरी पण एवढ्या मोठ्या प्रमाणात अस्पृश्य स्त्री-पुरुष सदर सभेला जमले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या भूमीत संदेश दिला की, “उद्या १ ऑगस्ट रोजी गुढीपाडव्याप्रमाणे स्वराज्याचा प्रारंभ दिन म्हणून साजरा करावा, असे काँग्रेसने फर्माविले आहे. काँग्रेस पक्षांने राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली म्हणून ते स्वराज्य झाले आणि आमच्यासारख्याने कोणी दिवाणपद घेतले तर मात्र ते स्वराज्य नव्हे, हे म्हणणे योग्य आहे काय? भावना व तत्त्वज्ञान क्षणभर बाजूला ठेवून व्यवहारी दृष्टीने विचार केला तर असे दिसून येईल की, गळे कापणारे सावकार, मजुरांना नाडणारे गिरण्यांचे मालक आपल्याला अन्य प्रकारे गांजणारे लोक जरी होते तसेच या देशात राहणार आहे. जमीनदार लोक, पाटील लोक हे सर्व तसेच राहणार. इंग्रज लोक निघून गेले तरी हे लोक कायम राहणार आहेत. म्हणून पूर्वीपेक्षाही आपणाला जास्त चिंता बाळगली पाहिजे. इतके दिवस एक गोष्ट आम्हाला पोषक होती. ती अशी की, इंग्रज मनुष्य जातीविषयक भावना व स्पृश्यास्पृश्य विचार पाळत नव्हता. यापुढे तुम्हाला गांजणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे. आता आपल्या लोकांची दाद घेणार तरी कोण? हे स्वराज्य नसून इतर लोकांचे आमच्यावर राज्य होणार आहे. म्हणून संघटना करणे हे तुमचे कर्तव्य आहे. संघटन केल्यास तुमची दैना शतपट होईल. आज महारावर जुलुम झाला तर पाटील, शिपाई, मामलेदार कोणी त्याला मदत करीत नाही. इतकेच नव्हे तर एक महार ही दुसऱ्या महाराला मदत करीत नाही. म्हणून जातीय संघटन अवश्य करा, अन्यायाच्या वेळी तरी त्याला मदत करा. पैशांशिवाय काही काम होत नाही. वकील, साक्षीदार, कोर्टाची प्रोसेस, मोटारचे भाडे या सर्व गोष्टींना पैसा लागतो. सबब न्याय मिळविण्यासाठी जातीचा फंड उभारा. एका गावात प्रयत्न करून तुम्ही न्याय मिळविला तर त्याची दहशत इतर गावांवर पडेल. तुमचे काम दुसऱ्याने करावे, अशी अपेक्षा का करता? तुमच्यासाठी श्री. बर्वे यांनी छात्रालय काढावे किंवा गांधींनी काढावे असे का? महाराष्ट्रात दहा लाख महार अस्पृश्य लोक आहेत. प्रत्येकाने एक रुपया दिला तर दहा लाखाचा फंड जमा होईल.
इंग्रज आता काही करू शकत नाही, याचे मी उदाहरण देतो. मंत्रीमंडळात होता होईल ती अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी घ्यावेत, असे बादशहाने गव्हर्नरला दिलेल्या आज्ञापत्रिकेत म्हटले आहे. हल्लीचे मंत्रीमंडळ गांधींच्या सांगण्यावरून तयार झाले. मंत्रीमंडळात महार-मांगांचा एकही प्रतिनिधी नाही. तरी पण गव्हर्नराने त्यात हात घातला नाही.
मी काँग्रेसला का मिळालो नाही, असा प्रश्न काही लोक विचारतात, त्याची कारणे अशी आहेत :-
(१) काँग्रेसच्या राजकारणात जर काही निष्पन्न झाले असेल तर ब्राह्मण्यांचा उदय झाला एवढेच मला दिसते. सहा प्रांतात कोण लोक दिवाण झाले ते पाहा. ब्राह्मण मुख्य प्रधान झाले आहेत. साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाईट आहे.
(२) मी अस्पृश्यांकरता जी चळवळ करतो ती बंद करा, असे मला सांगण्यात येते. परंतु मला पगाराची मातब्बरी नाही किंवा मान मिळविण्याचीही मला पर्वा नाही. तुम्ही लोकांनी स्वाभिमानी बनावे, हीच माझी आकांक्षा आहे व त्याकरता स्वतंत्र चळवळ करणे मला आवश्यक आहे. तुमच्यात व माझ्यात फरक एवढाच आहे की तुमच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे. म्हणून मी जास्त पाहू शकतो व धोका कुठे आहे मला समजते. काँग्रेसच्या लोकांनी काहीही म्हटले तरी मला त्याची पर्वा नाही. तुम्ही माणसे झालात म्हणजे माझे श्रम सफल झाले. हे स्वराज्य धोकादायक आहे. ज्यांच्या हाती सामाजिक सत्ता होती त्यांच्याच हाती राजकीय सत्ताही गेली आहे. तरी आज दरएक गावाने दहा रुपये तरी फंडाला द्यावे. म्हणजे तुम्हा लोकांना न्याय मिळविता येईल. आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाची पंधरा माणसे मुंबईच्या असेंबलीत आहेत. ही माणसे एका दावणीत पक्की बांधलेली आहेत. एकाचे तोंड एकीकडे व दुसऱ्याचे दुसरीकडे असे नाही. यामुळे काँग्रेस पक्षाला कोणाची भीती वाटत असेल तर आमच्या पक्षाची आहे. काँग्रेस पक्षाला मुसलमानांची भीती वाटत नाही किंवा लोकशाही पक्षाची भीती वाटत नाही. ही गोष्ट वल्लभभाई यांनी पुणे येथे जे भाषण केले त्यात उघड झाली.
आपण निवडणुकीच्या वेळी संघटनेने वागलो म्हणून हे फळ मिळाले. निवडणुकीच्यावेळी जी शपथ घेतली ती कायम ठेवा. आपल्या संस्थेची शाखा प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली पाहिजे. वरून मदत करणारा दाता कोणी नाही. जो कष्ट करील त्याची सत्ता असते. प्रत्येक संस्थेत आपली जास्त माणसे जातील, अशी एकजुटीने खटपट करा. काँग्रेसला हरिजनांची दया असती तर कोणतीही शर्त न घालता एखादा हरिजन त्यांनी मंत्रीमंडळात घेतला नसता काय? पण यासाठी आपण कोणाजवळ भिक्षा मागू नये. मी काँग्रेसच्या मंडळींशी कधी मसलत केली नाही, सव्वा मैल दूर राहिलो.
खान्देशात आपल्या पक्षाचे श्री. दौलत गुलाजी जाधव हे निवडून आलेले आहेत. त्यांच्याकडून काम करवून घ्या. या देशात आपणाला माणुसकीने वागवित नाहीत. ही गोष्ट तुम्ही विसरता. परंतु मी कधीच विसरु शकत नाही. सतत जागृत राहा म्हणजे यश मिळेल.” (संदर्भ-महाराष्ट्र शासन प्रकाशित – डॉ. बाबासाहेब आंबेडक लेखन आणि भाषण, खंड-१८-भाग-२)
याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धुळे येथील विजयानंद (स्वस्तिक) थियटरमध्ये संदेश दिला. भाषण संपल्याबरोबर सौ. नर्मदाबाई वाघ (लळींगकर), दशरथ धाकु वाघ (जुने धुळे) व इतर तालुक्यातील मंडळींनी हार अर्पण केले व शपथ विसर्जित करण्यात आली. सदर सभेतील भाषण इतके प्रेरणादायी होते की प्रत्येक माणसाने आपल्या मनात खुणगाठ बांधली की आपण समाजासाठी काही तरी देणे लागतो म्हणून तन-मन-धनाने बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले पाहिजे. नंतर समतावादी दलित मंडळाच्या स्काऊटसह डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर चौकास भेट दिली व डॉ. बाबासाहेब आंबेकरांची मोटार सायंकाळी ६ वाजता धुळे स्टेशनवर गेली. ती वेळ प्रताप मिल बंद होण्याची होती. मिलची सुट्टी झाल्याने सारा मिल कामगार हा आपल्या कामगार नेत्याच्या दर्शनाला स्टेशनवर जमला होता. आधिच स्टेशनवर अफाट जमाव जमला होता, त्यात आणखीनच मिल कामगारांची गर्दी जाऊन मिळाली होती. तेथे स्काऊटच्या लाठीकाठीची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सलामी देण्यात आली. सदरहू वेळी कॅप्टन भिमराव वस्ताद, साळुंखे, वेसा पहिलवान, शंकरराव घोडे, किसनराव कर्डक वगैरे मंडळींनी लाठीचे हात फिरविले. सदर ठिकाणीही अनेक स्त्री पुरुषांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार अर्पण केले. नंतर ६.४० वाजता सर्व मंडळींना निरोप दिला व गाडी चाळीसगांवकडे धावत सुटली.
आनंद सैंदाणे,
संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन समिती, धुळे
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धुळे भेट : एक वास्तव’
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायालयीन कामकाजानिमित्त 31 जुलै 1937 आणि 17, 18, 19 जून 1938 रोजी धुळ्यात आले होते. आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व आनंद सैंदाणे यांनी बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धुळे भेटीचे दस्तावेज संकलित केले. बाबासाहेबांनी खान्देशात विविध ठिकाणी भेट देत समाजप्रबोधन करण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिल्याचे पुरावेही त्यांना मिळाले. बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक कार्याच्या आठवणींना कायमस्वरूपी उजाळा मिळत राहिला तर आंबेडकरी चळवळ बळकट होण्यास मदतच होईल, हे ओळखून बाबासाहेबांनी ज्या ट्रॅव्हलर्स बंगल्यात मुक्काम केला होता, त्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आनंद सैंदाणे यांनी या ऐतिहासिक बंगल्याला ‘संदेश भूमी’ असे नाव दिले. तसेच संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन समितीची स्थापनाही केली. संदेश भूमी येथे बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा आणि ग्रंथालय उभारून याठिकाणी शिक्षण तसेच प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. महाराष्ट्रातील खान्देश आणि विशेष करून धुळे शहराशी बाबासाहेबांचा असलेला वारसा जगाला माहित व्हावा याकरिता आनंद सैंदाणे यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. संदेश भूमी राष्ट्रीय स्मारकाच्या चळवळीत खारीचा वाटा म्हणून आम्ही,आनंद जयराम सैंदाणे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धुळे भेट : एक वास्तव’ या पुस्तकाची लेखमाला प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या लेखमालेचा पहिला भाग रविवार दि. 21 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध होत आहे. आपण या लेखमालेला भरभरून प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा..!
– संपादक/संचालक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे
आनंद सैंदाणे (अध्यक्ष)
दीपक नगराळे (उपाध्यक्ष)
रवींद्र शिंदे (सचिव)
विजय भामरे (सहसचिव)
विजय सूर्यवंशी (कोषाध्यक्ष)
सदस्य : विजयराव मोरे, बाळासाहेब अहिरे, नाना साळवे, चंद्रगुप्त खैरनार, शरद वेंदे, चंद्रभान लोंढे, अमित सोनवणे, विद्रोही थोरात, आनंदा सोनवणे