खासदार डॉ. सुभाष भामरे करणार चार लाख दिव्यांचे वाटप
धुळे : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर प्रत्येक हिंदूधर्मीयांसह श्रीराम भक्तांच्या स्वप्नातील प्रभू श्रीरामांचे भव्य आणि आकर्षक मंदिर साकारले जात आहे. या मंदिरात प्रभू श्रीराम, माता सीता, श्री लक्ष्मण आणि श्री हनुमान यांच्या मूर्तींची येत्या सोमवारी (ता. २२) प्राणप्रतिष्ठा होत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहर तसेच मतदारसंघातील अन्य शहरे, गावागावांमधील श्रीराम भक्तांसह नागरिकांनी आपापल्या घरांच्या दारासमोर दीप लावून दीपोत्सव साजरा करावा, रांगोळ्या काढाव्यात, आपले गाव, वसाहत, कॉलनीतील वातावरण राममय करावे, रामलल्लाच्या स्वागतासाठी मंगल गीते लावावीत, परिसरात प्रसादाचे वाटप करावे, असे आवाहन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज येथे केले. दरम्यान, लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील शहरांसह गावागावांत उद्यापासून (ता. २०) सुमारे चार लाख दिव्यांचे वाटप करण्यात येत असून, शहरातील विविध प्रमुख मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात येणार असल्याचेही खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले.
येथील पारोळा रोडवरील राम पॅलेस या संपर्क कार्यालयात आज सायंकाळी पाचला खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषद घेतली. तीत ते बोलत होते. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर प्रदीप कर्पे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस यशवंत येवलेकर, जिल्हा प्रवक्ता श्यामसुंदर पाटील, चेतन मंडारो, आकाश परदेशी, पंकज धात्रक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार डॉ. भामरे म्हणाले, की अयोध्येमध्ये काही महिन्यांपासून श्रीराम जन्मभूमीच्या जागेवर रामलल्लाचे भव्य-दिव्य मंदिर साकारले जात आहे. या मंदिरात येत्या सोमवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. या सोहळ्यास श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास महाराज, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच देशातील सुमारे १२५ परंपरांचे संत-महापुरुष व देशातील सर्वशाखीय २५०० श्रेष्ठांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात स्थानिक पातळीवरही विविध धार्मिक कार्यक्रम, उपक्रमांचे विविध संस्था, संघटना, श्रीराम भक्तांकडून आयोजन करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रम, उपक्रमांमध्ये लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील नागरिकांनीही उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार डॉ. भामरे यांनी केले.
चार लाख दिव्यांचे वाटप
तब्बल ५०० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत श्रीराम मंदिर साकारले जात असून, या मंदिरात श्रीरामलल्लांच्या सोमवारी (ता. २२) होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील धुळे शहरासह मतदारसंघातील अन्य शहरांसह ग्रामीण भागातही उद्यापासून (ता. २०) चार लाख दिव्यांचे वाटप करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विविध आघाड्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिवे नागरिकांपर्यंत पोहोचविले जातील. तसेच शहरातील प्रमुख मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी रविवारी तसेच सोमवारी सायंकाळी आपापल्या घरांच्या दाराशी दीप लावून दीपोत्सव साजरा करावा. मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्या गावात, कॉलनीत तसेच परिसरात प्रसादाचे वाटप करावे, आपल्या जवळच्या मंदिरांमध्ये सामूहिक रामनाम संकीर्तन करावे, रामलल्लाच्या स्वागतासाठी मंगलगीते लावावीत, आपले शहर, गाव राममय बनवावे, असे आवानही खासदार डॉ. भामरे यांनी केले.