बापाला घाबरून घर सोडलेल्या मुलींना पश्चिम देवपूर पोलिसांनी आणले सुखरूप
धुळे : वडिलांना घाबरून घर सोडलेल्या तीन मुलींना पश्चिम देवपूर पोलिसांनी 24 तासांच्या आत शोधले असून, त्यांना सुखरूपपणे आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या अतिजलद शोध मोहिमेमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे शहराच्या देवपूरातील नगावबारी परिसरातील तीन सख्ख्या बहिणी 20 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत मुलीच्या आईने दिलेल्या माहितीवरून 21 जानेवारी रोजी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.
पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्याकडे दिला. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वतंत्र तपास पथक तयार केले आणि मुलींच्या शोधासाठी रवाना केले. पोलिसांनी सदर गुन्ह्याचा कसोशीने तपास करत मुलींचे नातेवाईक, मित्रमंडळी तसेच ओळख परिचयाच्या व्यक्तींना विचारपूस करून तीनही मुलींना शोधून उल्लेखनीय कामगिरी केली.
या मुलींना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की त्यांचे वडील त्यांना किरकोळ करणावरून रागवत असल्याने त्या रागाच्या भरात घरातून निघून गेल्या होत्या, असे सांगितले. सदर मुलींना तसेच त्यांच्या आई-वडिलांना समजावून सांगून तीनही मुलींना सुखरूप त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, हेड कॉन्स्टेबल मनोहर पिंपळे, मनोज साठे, कॉन्स्टेबल सनी सरदार, महिला पोलीस कॉन्स्टेबल सोनवणे, चालक पोलीस कॉन्स्टेबल किरण भदाणे यांच्या पथकाने केली.