धुळ्यातील पहिला पादचारी पूल खुला
धुळे (प्रतिनिधी) : विरोधकांनी जातीयवाद करीत माझ्या विकासकामांमध्ये नेहमीच खोडा घालण्याचा प्रयत्न केला. परंतु मी सर्व समाजघटकांसाठी प्रामाणिकपणे काम करून त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. विकासकामांच्या माध्यमातून मी मी धुळे शहरातून जातीयवाद संपुष्टात आणला आहे, असा आत्मविश्वास आमदार फारुख शाह यांनी व्यक्त केला.
कमलाबाई कन्या शाळेजवळील पादचारी पुलाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. सोमवारी हा पूल खुला झाल्याने शाळकरी मुलींची जीवघेणी धावपळ थांबली आहे.
धुळे शहर विधानसभा मतदारसंघात आमदार फारुख शाह यांनी नाविन्यपूर्ण कामांचा धडाका लावला आहे. मोठ्या शहरांमध्ये असतात तसा पादचारी पूल धुळ्यात देखील उभारला. वाहतुकीच्या वर्दळीमुळे उड्डाणपूल आणि पादचारी पुलांची नितांत गरज भासत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिजामाता कन्या विद्यालय, कमलाबाई गर्ल्स स्कूल आणि बाफना शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत होती. तसेच या परिसरात प्रमुख प्रशासकीय कार्यालये असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत होती. यावर उपाययोजना करण्यासाठी कमलाबाई गर्ल्स स्कूल ते बाफना शाळेपर्यंत पादचारी पुल करण्यात आला आहे. शालेय कालावधीत जिजामाता हायस्कूल, कमलाबाई गर्ल्स स्कूल आणि बाफना शाळेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत होती. विद्यार्थिनींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीचा खोळंबा ही नित्याचीच बाब झाली होती.
यासंदर्भात जिजामाता हायस्कूल, कमलाबाई गर्ल्स स्कूल आणि बाफना शाळेच्या विद्यार्थिनींच्या पालकांनी आणि मुख्याध्यापकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे याठिकाणी पादचारी पुल उभारण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानुसार आमदार स्थानिक विकास निधीतून सुमारे ८० लक्ष खर्चातून पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलाचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आता हा पूल शाळकरी मुला-मुलींसह सर्वांसाठी खुला झाला आहे.
याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, कमलाबाई गर्ल्स स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा जोशी, बाफना शाळेच्या मुख्याध्यापिका आशा भामरे, बाफना संस्थेच्या सदस्या साधना मानेकर, डॉ. दीपश्री नाईक, सुलोचना अग्रवाल, पत्रकार रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गणी डॉलर, नगरसेवक आमिर पठाण, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, इकबाल शाह, कैसर अहमद, डॉ. शराफत अली, वाकळे सर, डॉ. बापुराव पवार, फातेमा अन्सारी, हलीम शमसुद्दिन, मलेका खाटीक, अकेला आसिफ, शायेदा अन्सारी, रिझवाना शेख, सलमान खान, नजर पठाण, फैसल अन्सारी, समीर मिर्झा यांच्यासह पालक, शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.