अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी
धुळे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा योजनेच्या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. परंतु शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी अक्कलपाडाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाण्याची आवर्तन सोडले जाईल, अशी माहिती आमदार कुणाल पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
धुळे शहरासाठी अक्कलपाडा प्रकल्पातून कॅनाॅलद्वारे पाणी सोडले तर शेतकऱ्यांच्या विहिरींना आणि गाव तलावांना पाणी येत असे. परंतु पाईपलाईन झाल्यापासून शेतकऱ्यांच्या शेतीचा सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल धुळे ग्रामीणमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे किंवा कसे याविषयी प्रश्न विचारला असता आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, शेतीला पाणी मिळाले पाहिजे या मुळ उद्देशाने माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांनी अक्कलपाडा धरणाची निर्मिती केली. परंतु अक्कलपाडा धरणाचे काही पाणी एमआयडीसी आणि धुळे शहरासाठी देखील आरक्षित आहे. कॅनाॅलद्वारे ते पाणी नकाने तलाव आणि हरणमाळ तलावात आणतच होतो. परंतु पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा जो उपद्व्याप केला गेला, त्याबाबतीत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. याबाबत शंभर टक्के खरं आहे. परंतु शेतकऱ्यांना असं वाटतं की, तुम्ही जर धुळे शहराला पाणी देत असाल तर आमचं हक्काचं पाणी आमच्या करीता सोडा. त्यासाठी अनेकदा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली आहेत. याबाबत पालकमंत्र्यांशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि अक्कलपाडा धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडून शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत, असे आमदार पाटील म्हणाले.
अक्कलपाडा प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न : अक्कलपाडा प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाना प्रयत्न भाजपाचे नेते करताना दिसतात परंतु करपाडा प्रकल्प झाला त्यावेळी मुळात भाजपाची सत्ता नव्हती हा प्रकल्प माझी मंत्री रोहिदास पाटील यांनीच मार्गी लावला आहे हे जनतेला माहित आहे असे आमदार कुणाल पाटील यांनी स्पष्ट केले.
लोकसभेसाठी काॅंग्रेसचे इच्छुक उमेदवार : मी लोकसभेसाठी उमेदवारी मागितलेली नाही. त्यामुळे मी काँग्रेसचा लोकसभेचा उमेदवार नाही, असे स्पष्ट करून आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की, धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तुषार शेवाळे, आणि माजी पोलीस अधिकारी अब्दुर रहमान यांनी उमेदवारी मागितलेली आहे. महाविकास आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर दोन दिवसात जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल.
काॅंग्रेसचे विभागीय शिबिर शनिवारी धुळ्यात : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने उत्तर महाराष्ट्र विभागात जिल्हानिहाय आढावा बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूीवर घेतल्या जात आहेत. काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शनिवार 27 जानेवारी नाशिक विभागीय बैठकीचे आयोजन धुळ्यातील गोंदूर शिवारातील साई-लक्ष्मी लॉन्स येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळात होत आहे.
या बैठकीत नाशिक अहमदनगर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या पाचही जिल्ह्यांचा जिल्हानिहाय आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी दिली. शहरातील पारोळा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सभागृहात गुरुवारी सकाळी आमदार पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उत्तर महाराष्ट्र विभागाचे शनिवारी एक दिवसीय शिबिर होत असल्याने त्याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलविली होती. त्यावेळी ते बोलत
होते.
आमदार पाटील म्हणाले की, विभागातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यंमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्यासह सर्व प्रदेश उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सरचिटणीस आणि नगर, नाशिक ,धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील हजारांहुन अधिक कार्यकर्तें, पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
या बैठकीत राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. या एकदिवशीय शिबिरात बुथ कमिट्या, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी, संघटनात्मक बांधणी आदी विषयांवर चर्चा होईल. सकाळी 10 ते 1 या पहिल्या सत्रात जिल्हाध्यक्ष शहर, ग्रामीण, जिल्हा प्रभारी, सह प्रभारी , आमदार, माजी खासदार,माजी आमदार, जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी, काँग्रेस कमिटी सदस्य, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जि. प. चे आजी-माजी
पदाधिकारी, माजी महापौर, उपमहापौर, नगरपरिषद, नगरपालिकेचे माजी पदाधिकारी, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रमुख नेते, जिल्ह्यातील ब्लॉक तालुकाध्यक्ष, आघाडी संघटना, अध्यक्ष, विविध सेलचे प्रमुख यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.
दुपारी 2.30 ते 5.30 वाजेच्या दुसर्या सत्रात जिल्हा ग्रामीण, शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारणी, ब्लॉक, तालुका काँग्रेसची कार्यकारणी, न. पा., न. प. नगरपंचायत, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, दुध संघ, साखर कारखाना, सुतगिरणी या संस्थांच्या आजी-माजी संचालक जिल्ह्यातील आघाडी, विभाग, सेलचे कार्यकारणी, मंडळ, प्रभाग अध्यक्ष यांना निमंत्रीत करण्यात आले आहे.
या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यातील मंडल कमीट्या, बुथ कमीट्या, बुथ लेव्हल संदर्भात आढावा घेण्यात येणार आहे. याच शिबिरात सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राचे सर्व शहर आणि ग्रामीणचा आढावा घेतला जाईल. शनिवारी होणार्या एक दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभाग जिल्हानिहाय आढावा बैठकीस धुळे
जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या ग्रामीण आणि शहरातील सर्व पदाधिकार्यांसह उपस्थित रहावे, असे आवाहनही आ. कुणाल पाटील यांनी केले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, उपसभापती योगेश पाटील, एन. डी. पाटील, गुलाबराव कोतेकर, बबलू सैंदाणे, गंगाधर माळी, महादू परदेशी, आप्पा खताळ, गंगाराम कोळेकर, डॉ. दरबारसिंग गिरासे, रमेश श्रीखंडे आदी उपस्थित होते.
हेही वाचा