अंचाळे धरणात जामफळ प्रकल्पातून तापीचे पाणी आणणारच : खासदार डॉ. भामरे
धुळे : धुळ्यासह शिंदखेडा तालुक्यांतील एकूण २०० गावांचे भाग्य बदलणारा व जिल्हावासीयांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे काम वेगात सुरू आहे. ७० टक्क्यांहून अधिक काम झालेला हा प्रकल्प येत्या वर्ष-दीड वर्षात पूर्ण झालेला असेल. यामुळे लाभक्षेत्रात न येणाऱ्या मुकटीसह तालुक्यातील पूर्व-दक्षिण पट्ट्यातील गावांनाही या प्रकल्पाचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे. यातून अंचाळे धरणातही जामफळ प्रकल्पामधील तापीचे पाणी आणणारच, हा आपला शब्द आहे. यातून पिण्यासह सिंचनाचा प्रश्न सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.
विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत मुकटी येथे नुकताच कार्यक्रम झाला, त्यावेळी खासदार डॉ. भामरे बोलत होते. भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र शर्मा, बाजार समितीचे माजी उपसभापती रितेश सैंदाणे, सरपंच मंगलाबाई पारधी, उपसरपंच आशाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य योगिराज सैंदाणे, कल्पनाबाई पाटील, हर्शल साळुंके, पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास पाटील, ग्रामसेविका रेखा विसपुते, किरण साळुंके, सुरेश देवरे, विविध विभागांचे कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुष्यमानची पाच हजारांवर पात्र कुटुंबे : खासदार डॉ. भामरे म्हणाले, की विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत गावागावांत रथयात्रा फिरत आहे. याद्वारे केंद्र सरकारच्या विविध ७२ योजनांची माहिती देण्यासह या योजनांच्या लाभापासून वंचित असलेल्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न होत आहे. जेणेकरून समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या प्रवाहात यावा. मुकटी येथील पाच हजार १२० कुटुंबे आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाच लाखांच्या मोफत उपचारांसाठी पात्र आहेत. यातील तीन हजार ८०० कुटुंबांना या योजनेचे कार्ड देण्यात आले असून, उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच हे कार्ड दिले जाईल. त्यासाठीची कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांनी करून द्यावी.
मुकटी परिसरासाठीही पाणी देणार : डॉ. भामरे म्हणाले, की आपल्या गेल्या १० वर्षांच्या खासदारकीच्या काळात लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील सिंचनाच्या प्रश्नांना प्राधान्य देत ते पूर्ण केले. धुळे व शिंदखेडा तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली प्रकल्पाचेही ७० टक्के काम झाले असून, वर्ष-दीड वर्षात ते पूर्ण होईल. यातून शिंदखेडा व धुळे तालुक्यातील प्रत्येकी १०० अशा २०० गावांचा पिण्यासह सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. जी गावे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नाहीत अशा गावांसाठीही प्रकल्पातून पाणी देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यानुसार मुकटी परिसरातील गावांसाठीही अंचाळे धरणात पाणी आणले जाईल, हा माझा शब्द आहे, अशी ग्वाहीही खासदार डॉ. भामरे यांनी दिली.
No.1 Maharashtra
हेही वाचा
अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी