मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी पालकांसह गावाचाही सहभाग महत्त्वाचा : सीईओ शुभम गुप्ता
धुळे : जिल्हा परिषद शाळांमधील मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील असून, यामध्ये पालकांचा व गावाचा सहभाग देखील महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी केले.
धुळे तालुक्यातील गोंदूर येथे प्राथमिक शाळेत बालस्नेही गाव अंतर्गत ‘एकजूट गावाची, सर्वांगीण शालेय विकासासाठी’ या उपक्रमांतर्गत प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ‘हर घर बलून अभियान’ व शैक्षणिक ग्रामसभा मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सीईओ गुप्ता यांच्या समवेत बलून बनविण्याचा आनंद लुटला. तसेच प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी बोलताना सीईओ गुप्ता म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व गुणवत्ता वाढीसाठी पालकांचा व गावाचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. आपले मुल काय शिकत आहे, याविषयी पालकांनी जागरूक असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गुप्ता यांनी ग्रामसभेचा उद्देश सांगून किशोरवयीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गावातील विशेष कलागुण लाभलेले ग्रामस्थ यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शाळेची गुणवत्ता वाढावी याकरिता गावातील सुशिक्षित तरुण व सेवानिवृत्त कर्मचारी तथा व्यावसायिक यांचा सहभाग व मार्गदर्शन, माता पालक गटांची जबाबदारी, सामाजिक कार्यकर्ते तथा गावाचे नेतृत्व करणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ यांची शाळेप्रतीची भूमिका व सहकार्य, शालेय शिक्षकांचे शाळेची गुणवत्ता वाढीसाठी असलेली जबाबदारी तसेच अधिकचे दायित्व या सर्वच विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सरपंच अनिता कैलास पाटील, उपसरपंच हिरामण पाटील, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण नेरकर, शरद भदाणे, विशाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते किशोर भदाणे, बापूदादा, सुभाष आबा, कैलास पाटील, अमर पाटील, मोतीलाल आप्पा, प्रदिप माळी, आधार बापू, ग्रामविकास अधिकारी सुधीर भामरे मुख्याध्यापक एकनाथ भामरे सर्व सहकारी शिक्षक बंधू,भगिनी पालक, अंगणवाडी सेविका, बहुसंख्य पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन किशोर भामरे यांनी केले.