नाट्यसंमेलनानिमित्त जागर स्पर्धात्मक महोत्सवांतर्गत आज पत्रकार भवनात एकांकिका स्पर्धा
धुळे : दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित शंभरावे नाट्य संमेलनाच्या निमित्ताने जानेवारी ते मे २०२४ महाराष्ट्रभर नाट्यकलेचा जागर सुरु आहे. त्याअंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कलावंत, नाट्यकर्मींसाठी नाट्यकलेचा जागर हा स्पर्धात्मक महोत्सव १५ जानेवारीपासून सुरू झाला आहे. यात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्य अभिवाचन, नाट्यछटा आणि नाट्यसंगीत पद गायन स्पर्धांचा समावेश आहे. याअंतर्गत नाट्य परिषदेच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे देखील विविध स्पर्धा सुरु असून एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी रविवार दि. २८ जानेवारी रोजी पत्रकार भवन, साक्री रोड, धुळे येथे दुपारी ३ वा. होणार आहे. यातील विजेत्यास विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळेल. त्यानंतर उपांत्य अंतिम फेरी होईल. अशा तीन फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होईल. त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरीचे आयोजन केले आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी चार दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन केले असून, व्यावसायिक कलावंतांसह महाराष्ट्रातील हौशी कलावंतांना नाट्यसंमेलनात कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे. या स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच झाली आहे. अशी माहिती धुळे शाखेचे अध्यक्ष सुनिल नेरकर, मुंबई नियामक मंडळ सदस्य चंद्रशेखर पाटील, सुजय भालेराव, नंदुरबार – नागसेन पेंढारकर ,साक्री – राजन पवार,शिरपूर जयवंत पाटील,शिंदखेडा – राहुल मंगळे यांनी दिली.