दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजनेचा लाभ घ्यावा
धुळे : महाराष्ट्र शासनाने 5 जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना दूधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहिर केले आहे. या योजनेचा कालावधी 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 असून जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मिलींद भणगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विकास विभाग संयुक्तरित्या या योजनेची अंमलबजावणी करीत आहेत. त्यानुसार राज्यातील सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्प, शितकरण केंद्रे व फॉर्मर प्रोड्यूसर कंपनी यांना योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज सादर करण्यासाठी कळविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची छाननी करून धुळे व नंदुरबार जिल्ह्यासाठी तीन सहकारी संघ प्रकल्पांना माहिती भरण्यासाठी लॉगीन आयडी व युजर आयडी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पशुसंवर्धन विभाग व दुग्धव्यवसाय विकास विभागामार्फत प्रकल्पांसमवेत संयुक्तरित्या बैठक घेवून योजनांची माहिती देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जनावरांना ईयरटॅग करण्याची कार्यवाही सुद्धा मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. तसेच या योजनेपासून एकही दूध उत्पादक शेतकरी वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी जनवारांचे ईयरटॅग करून घेण्यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा. तसेच दुध पुरवठा करत असणाऱ्या प्राथमिक सहकारी दुध संस्था, दुध संकलन केंद्र, शितकरण केंद्र यांच्याकडे आपला दैनदिन तसेच 10 दिवसाचा तपशिल देऊन योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मिलींद भणगे यांनी कळविले आहे.