पिक विमा रक्कमेतून कर्जाची वसूली थांबवा, धुळे तालुका काँग्रेसची मागणी
धुळे : तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळ जाहिर झाल्याने शासनाने दुष्काळी सवलती जाहिर केल्या आहेत. तसेच खरीप हंगामातील पिकांसाठी 25 टक्के अग्रीम पिक विमा रक्कमही शेतकर्यांच्या खात्यात जमा होत आहे. मात्र जमा होणार्या पिक विमा रक्कमेतून बँका कर्जाची वसूली करीत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे. म्हणून शेतकर्यांच्या पिक विमा रक्कमेतून सक्तीची कर्ज वसूली करु नये, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे करण्यात आली.
शेतकर्यांच्या पिक विमा रक्कमेतून होणारी सक्तीची कर्ज वसूली तत्काळ थांबविण्यात यावी या मागणीसाठी आ. कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 30 जानेवारी रोजी धुळे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन जिल्हाधिकार्यांचे प्रतिनिधी बी. बी. पावरा, नायब तहसिलदार यांनी स्विकारले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि, यंदाच्या खरीप हंगामात धुळे जिल्हयात सरसरीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्याने दुष्काळ जाहिर करण्यात आला आहे. दुष्काळ जाहिर झाल्याने पिक विम्यासह दुष्काळात दिल्या जाणार्या सर्व सवलतीही लागू झाल्या आहेत. मात्र शासन तसेच शासकीय कर्मचार्यांकडून दुष्काळी सवलतींची अद्याप अंमलबजावणी होतांना दिसत नाही. शासनाने 25 टक्के पिक विमा अग्रीम रक्कम मंजुर केला आहे. सदर पिक विम्याची रक्कम शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र या रक्कमेतून शेतकर्यांनी घेतलेल्या कर्जाची वसूली करुन पिक विमा रक्कम शेतकर्यांच्या कर्जापोटी वसूल केली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये असंतोष पसरला आहे. म्हणून पिक विमा रक्कमेतून बँकांकडून होणारी सक्तीची कर्ज वसूली तत्काळ थांबविण्यात यावी तसेच वसूल केलेली रक्कम पुन्हा शेतकर्यांच्या खात्यात वर्ग करावी. तसेच नोव्हेंबर-2023 मध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई आणि खरीप हंगामातील दुष्काळी अनुदानही शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यावेळीही जमा होणार्या या रक्कमेतून शेतकर्यांच्या कर्जवसूली करुन नये. त्यासंबधीचे आदेश संबधित बँकेच्या अधिकार्यांना देण्यात यावेत.
तसेच जमीन महसुलात सूट देणे, पिक कर्जाचे पुनर्गठन करणे, कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट देणे, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी देण्यात यावी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता द्यावी, आवश्यक त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर्स सुरु करावेत इत्यादी दुष्काळ सवलतींची अंमलबजावणी करण्यात यावी अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना बाजार समितीचे सभापती बाजीराव पाटील, धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉ. दरबारसिंग गिरासे, बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, पं. स. चे माजी सभापती भगवान गर्दे, माजी पं. स. सदस्य पंढरीनाथ पाटील, संचालक ऋषीकेश ठाकरे, युवक काँग्रेस माजी अध्यक्ष हर्षल साळुंके, संचालक बापू खैरनार, माजी सरपंच रोहिदास पाटील, माजी सरपंच सोमनाथ पाटील, उपसरपंच हिरामण पाटील, झुलाल पाटील, संचालाक सुरेश भिल, प्रल्हाद मराठे, कृष्णा पाटील, कांतीलाल पाटील, विलास पाटील, पं. स. सदस्य भाऊसाहेब पाटील यांच्यासह धुळे तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.