शिरपूर तालुका पोलिसांनी 22 लाखांचा गुटखा पकडला
शिरपूर : शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे नवनियुक्त पीआय श्रीराम पवार यांच्यासह पथकाने सलग दुसर्या दिवशी गुटखा तस्करांना दणका दिला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेक पोस्टनजीक 15 लाखांचा ट्रक व 22 लाखांची स्वादिष्ट सुपारी व सुगंधीत तंबाखू जप्त करण्यात आली. पोलिसांच्या या कामगिरीचे पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रपरिषदेत कौतूक केले.
मुंबई-आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेक पोस्टवर 31 रोजी सायंकाळी 7 ते रात्री 11 दरम्यान नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करण्यात येत होती. त्यादरम्यान पीआय श्रीराम पवार यांना गुप्त माहिती मिळाली की, सेंधव्याकडून शिरपुरकडे एम.एच.43, सीई 0950 या आयशर ट्रकमधून राज्यात प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री करण्यासाठी वाहतुक होत आहे. त्यानुसार पथकाने वाहना शोध सुरू केला. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास हाडाखेड चेक पोस्टजवळ संशयित वाहन दिसताच चालकास थांबण्याचा इशारा केला. त्यादरम्यान अंधाराचा फायदा घेत वाहन सोडुन चालक पळुन गेला. तर क्लीनर हा पळत असतांना त्याला पथकाने पाठलाग करीत पकडले. त्याने त्याचे नाव अनुप पिता दिलीपकुमार शुक्ला (वय 23 रा. लहरी पो. लहरा ता.खेसहारा जि. सिध्दार्थनगर)असे सांगीतले. वाहनाची तपासणी केली असता त्यात राज्यात प्रतिबंधीत गुटखा मिळून आला. 13 लाख 65 हजारांची बनारसी आशिक स्वादिष्ट सुपारी, 6 लाख 72 हजारांची सुगंधित तंबाखू, 2 लाख 1 हजार 600 रूपयांची मिरज सुगंधित तंबाखू व 15 लाखांचा ट्रक एकुण 37 लाख 38 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोसई कृष्णा पाटील, पोहेकॉ संतोष पाटील, संदिप ठाकरे, पोना मोहन पाटील, पोकॉ योगेश मोरे, संजय भोई, स्वप्नील बांगर, मनोज पाटील या पथकाने केली.