बाबासाहेबांच्या स्मारकाजवळील दारू दुकान हटविण्यासाठी आमरण उपोषण
धुळे : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप नावाचे दारू दुकान हटविण्यासाठी आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी गुरुवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली. आनंद लोंढे आणि त्यांचे समर्थक क्युमाईन क्लब रस्त्यावर आमरण उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान, आमरण उपोषण सुरू झाल्याची माहिती मिळतात आंबेडकर चळवळीतील विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.
बॅनर हटविण्याचा प्रयत्न : विनोद वाईन शॉप हटविण्यासंदर्भात आमरण उपोषण सुरू करण्याबाबतचे डिजिटल बॅनर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आले होते. आझाद समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी लावलेले हे बॅनर हटविण्यासाठी पोलिस आणि महानगरपालिकेच्या पथकाने प्रयत्न केले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण स्थळ सोडून महानगरपालिकेसमोरच उपोषणाला सुरुवात केली. या ठिकाणी प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर वाद निवळला.
बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ असलेले दारू दुकान हटविण्यासाठी आझाद समाज पार्टीसह समाज बांधवांनी उभारलेल्या आंदोलनाला बहुजन समाज पार्टीने जाहीर पाठिंबा दिला आहे. बहुजन समाज पार्टीचे नेते आनंद सैंदाणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी जाऊन आनंद लोंढे यांना पाठिंब्याचे पत्र सुपूर्द केले. पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, बहुजन समाज पार्टी हा पक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कार्य करणारा पक्ष असल्याने आणि सदरचे जन आंदोलन हे विधायक असल्याने आम्ही पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.