अक्कलपाडा प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे तलाव भरण्यासाठी आवर्तन
धुळे : दर वर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या निमडाळे (ता. धुळे) येथील ग्रामस्थांचा यंदाचा उन्हाळा मात्र दिलासादायक जाणार आहे. यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा सततचा पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे निमडाळे येथील तलाव भरण्यासाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर तशी कार्यवाही झाली असून, येत्या दोन दिवसांत हे पाणी निमडाळे येथील शिपाई तलावात पोहोचून निमडाळेकरांना पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
यंदा कमी पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर निमडाळे येथील ग्रामस्थांना गेल्या तीन महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. तेथील ग्रामस्थांना चक्क २० ते २५ दिवसांनंतर पाणी मिळत होते. कमी पावसाअभावी दर वर्षीच निमडाळेकरांवर ही परिस्थिती ओढवत होती. याबाबत निमडाळेचे सरपंच सुधाकर सैंदाणे, उपसरपंच नितीन सूर्यवंशी, भाजपचे तालुका सरचिटणीस शरद पाटील आणि ग्रामस्थांनी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्याकडे पाणीटंचाईबाबत कैफियत मांडली. त्याची तीव्र दखल घेत खासदार डॉ. भामरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची चार वेळा बैठक झाली. गेल्या सहा जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्यासह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. तीत निमडाळे येथील ग्रामस्थांनी पाणीटंचाईचे वास्तव सांगत अक्कलपाडा प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे निमडाळे येथील शिपाई तलाव भरण्याची मागणी केली. त्यावर खासदार डॉ. भामरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे यासाठी येणाऱ्या अडचणींवर चर्चा करत तातडीने या अडचणी दूर करून अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे निमडाळे येथील शिपाई तलाव भरण्याची कार्यवाही करावी व निमडाळेकरांना पिण्यासाठी पाणी द्यावे, अशी सूचना केली.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवर्तन सोडण्याचे निर्देश : या सूचनांनुसार पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण करत येणाऱ्या अडचणी दूर केल्या. तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकारी व खासदार डॉ. भामरे यांना दिला. त्यानुसार जिल्हाधिकारी गोयल यांनी अक्कलपाडा प्रकल्पातून डाव्या कालव्याद्वारे निमडाळे येथील शिपाई तलाव भरण्यासाठी आवर्तन सोडण्याची निर्देश पाटबंधारे विभागाला दिले. त्यानुसार बुधवारी (ता. ३१) अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून आवर्तन सोडण्यात आले असून, ते उद्या (ता. २) सायंकाळपर्यंत निमडाळे येथील शिपाई तलावात पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष रवंदळे-पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, पक्षाचे तालुका सरचिटणीस शरद पाटील, निमडाळेचे सरपंच सुधाकर सैंदाणे आदींनी बुधवारी कालव्यातून सोडलेल्या पाण्याची पाहणी केली.
निमडाळेकरांनी मानले खासदारांचे आभार
निमडाळे येथील पाणीटंचाईच्या मुद्द्यावर खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पाटबंधारे व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची चार वेळा बैठक घेत निमडाळे येथील शिपाई तलाव भरून घेण्यासाठी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्यामुळेच निमडाळे येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांनी तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉ. भामरे यांचे आभार मानले आहेत.