बनावट जीएसटी अधिकारी प्रकरणाचा अखेर छडा, फसवणूकीची रक्कम वाढणार : SP Dhule
धुळे : महामार्गावर बनावट जीएसटी अधिकारी असल्याची बतावणी करीत ट्रक चालकांना लुबाडणार्या टोळीचा अखेर पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पर्दाफाश केला असून टोळीतील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यात दोन पोलिस कर्मचार्यांसह एक महिलेचाही समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 71 लाखांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले असून चौकशीत ही रक्कम आणखी वाढले. तसेच एक खाजगी व्यक्ती देखील आमच्या रडारवर असल्याचे माहिती पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
पंजाब राज्यातील पटीयाला येथील व्यापारी कश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा (वय 59) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द आझादनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. गुन्ह्यातील अनोळखी 3 ते 4 आरोपीतांनी संगनमत करून लाल दिव्याची टाटा सुमो गाडीचा वापर करून फिर्यादी यांचा माल घेवून जाणार्या ट्रकला (क्र. पीबी 11 सीझेड 0756) अडविले. ट्रक चालकास जीएसटी अधिकारी असल्याचे भासवुन ट्रकमधील मालाच्या पावत्यांची पाहणी करून टॅक्स इन्व्हाईस बिलात फर्मच्या नावात चुक असल्याचे सांगुन फिर्यादी यांच्याशी मोबाईलवरील व्हॉटसअॅपव्दारे संपर्क साधुन फिर्यादीकडुन प्रथम 12 लाख 96 हजार रुपये दंडाची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती 1 लाख 30 हजार रुपये मोबाइलवरील गुगल-पे व्दारे स्विकारुन फिर्यादी व्यापार्याची फसवणुक केली. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे सुचना सहा.पोलीस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी व पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी गुन्हयाचा सखोल तपास करुन आरोपीच्या गुन्हा करण्याच्या पध्दतीवरुन व तांत्रिक विश्लेषणावरुन गुन्हा उघडकीस आणला. याप्रकरणात स्वाती रोशन पाटील (रा नाशिक) ही नाशिक येथून तर पोलिस कर्मचारी बिपीन आनंदा पाटील (रा.धुळे) व इम्रान ईसाक शेख (रा.धुळे) यांना काल रात्री अटक करण्यात आली. स्वाती ही बिपीन पाटील यांची बहिणी असून या गुन्ह्यात अद्यापपावेतो फिर्यादी व इतर साक्षीदारांची एकुण 71 लाख 33 हजार 984 रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हयातील इतर निष्पन्न आरोपी हे फरार असुन त्यांचा शोध चालु आहे. तसेच गुन्ह्यातील आरोपींकडून जी.एस.टी.अधिकारी असल्याचे भासवून ज्या व्यापार्यांची फसवणूक झाली असेल अशा व्यापार्यांनी आझादनगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील पोलिस अधिक्षक श्री. धिवरे यांनी केले आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा.पोलीस अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब थोरात, सपोनि संदीप पाटील, सपोनि उमेश बोरसे, महिला पोसई खालीदा सय्यद, पोहेकॉ योगेश शिरसाठ, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, योगेश शिंदे, मुक्तार मन्सुरी, पोना गौतम सपकाळे, पोकॉ मकसुद पठाण, अनिल शिंपी, पंकज जोंधळे, सचिन जगताप, सिध्दार्थ मोरे, धिरज काटकर, वंदना कासवे तसेच विशेष पथकातील पोसई दत्तात्रय उजे, पोहेकॉ किरण कोठावदे, महेंद्र भदाणे, पोकॉ निलेश पाकड यांच्या पथकाने केली आहे.
निलंबन, चौकशी करणार : या प्रकरणातील पोलिस कर्मचारी बिपीन पाटील (रा.धुळे) व इम्रान ईसाक शेख (रा.धुळे) या दोघा पोलिस कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांची चौकशी सुरू केली जाणार आहे. तसेच याप्रकरणात वापरण्यात आलेल्या वाहनाचे लॉक बुक सील केले असून ते जप्तही करण्यात आले आहे. तसेच प्रकरणात नवनवीन बँक अकाऊंट समोर येत असून फसवणूकीची रक्कम आणची वाढणार असल्याचेही पोलिस अधिक्षक धिवरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.