त्यांच्या हजारो रुपयांपेक्षा तुमची पावली मला लाखांची आहे!
कोर्टाच्या कामासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ता. १७ जून १९३८ रोजी सकाळच्या गाडीने धुळे येथे आले. स्टेशनवर प्रमुख मंडळी हजर होती. स्काऊट पथकांनी बाबासाहेबांना सलामी दिली. दुपारी कोर्टात तुफान गर्दी लोटली होती. अपील संपल्यानंतर वकील मंडळीच्या विनंतीला मान देवून बाबासाहेबांनी बार, लायब्ररीला भेट दिली. तेथे काकासाहेब बर्वेंतर्फे चहापान झाले. संध्याकाळी बाबासाहेबांनी राजवाडे संशोधन मंडळाला भेट दिली. तेथे तात्यासाहेब भट वकील, भाऊराव कुलकर्णी वकील, काकासाहेब बर्वे वकील, रा. उपाध्ये, खरटमल, श्री. जाधव, बोराळे वगैरे मंडळी हजर होती. बराच वादविवाद झाल्यानंतर पाठक शास्त्री हे जातीने हजर झाले. भट वकील व शास्त्रीबुवा यांनी योग्य ती माहीती पुरविण्याचे अभिवचन दिल्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत.
रात्री सुमारे आठ वाजता म्युनिसिपल शाळा नंबर पाचच्या आवारात सभा घेण्यात आली. सभेला सुमारे पाच ते सहा हजारांचा जनसमुदाय होता. प्राणयज्ञ दल संस्थेची मंडळी आपल्या लाल पोषाखात हजर होती. स्त्री समूहही भरपूर होता. बाबासाहेब, जाधव इत्यादी आल्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. बाबासाहेबांच्या नावाच्या जयजयकाराने सर्व सभास्थान दुमदुमून गेले होते.
यशवंतराव चिंतामण गायकवाड, सौ. कृष्णाबाई अहिरे, गोजरबाई बागले, अहिल्याबाई देवराव, कु. सावित्रीबाई सावंत, सौ. आनंदीबाई जाधव यांची स्फुर्तिदायक भाषणे झाली. त्यानंतर पश्चिम खान्देशचे भावी तरुण, उत्साही पुढारी पुंडलिकराव तुकाराम बोराळे यांचे भाषण झाले. या मंडळींची भाषणे झाल्यावर निरनिराळ्या संघांतर्फे व महार सुशिक्षित स्त्री पुरुषांकडून डॉ. बाबासाहेबांना सुमारे ४० हारतुरे अर्पण करण्यात आल्यावर आले. डॉ. बाबासाहेब हे टाळ्यांच्या गजरात भाषण करण्यास
उभे राहिले.
बाबासाहेब म्हणाले,
“प्रिय भगिनींनो आणि बंधुंनो,
या भागात बरेच दिवसांपासून येणे झाले नाही. मला निरनिराळ्या जिल्ह्यातील पत्रे आली आहेत. मध्यप्रांत, संयुक्त प्रांत, पंजाब प्रांत वगैरे प्रांतातून अनेक लोकांची पत्रे आलेली आहेत. किंबहुना हिंदुस्थानातून मला बोलविण्याविषयी पत्रे आलेली आहेत. सर्व हिंदुस्थानातून मला बोलविण्याविषयी पत्रे येतात असे म्हटल्यावर अतिशयोक्ती होणर नाही. हा देश किती अफाट आहे ! एकट्या माणसाने कितीसा कामाचा बोजा न्यावा? दुसरी गोष्ट माझी प्रकृती हल्ली बरी नाही. गेल्या दोन महिन्यात ३८ पौंड वजन कमी झाले आहे. तरीपण इतर भागांच्या मानाने या भागाकडे दुर्लक्ष झालेले आहे. याची भरपाई मी केव्हा तरी करीन इतकंच आश्वासन मी आज देऊ शकतो.
गेल्या दहा वर्षांपासून जे राजकारण व समाजकारण चालू आहे, त्या चळवळीचा औध कोणत्या थराला जाईल याची मला भीती वाटते. एक गोष्ट मात्र खरी की, राजकीय बाबतीमध्ये भीती बाळगण्याचे कारण नाही. डोकावून सुद्धा ज्यांची सावली लोक घेत नव्हते त्यांचीच १५ माणसे असेंब्लीत बसून अधिकाराने व हक्काने आपली गाऱ्हाणी सांगू शकतात. आज मुंबईच्या कायदे मंडळात काँग्रेससारखी प्रबळ संस्था आहे. एवढ्या मोठ्या संस्थेस स्वतंत्र मजूर पक्षाची भीती वाटते. (टाळ्या) ही गोष्ट अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने काही कमी नाही.
काँग्रेसमध्ये आज लाखो रुपये खर्च करणारे सावकार आहेत. शिक्षणामध्ये पारंगत झालेल्या ब्राह्मणांचा भरणा आहे. काही म्हटले तरी ४० वर्षाचा तिच्या पाठीमागे इतिहास आहे. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापून अवघे एक वर्ष झाले आहे. तरी एका वर्षात कामगिरी इतकी मोठी झाली आहे की स्वतंत्र मजूर पक्षाचे नाव ठाऊक नाही असा एकही स्त्री-पुरुष आढळणार नाही. परंतु त्याची इतर पक्षास भीती वाटते हा राजकारणातील विलक्षण प्रकार आहे. मराठा अगर कुणबी यांना आपणाजवळ याचना करण्याची लाज वाटत होती ते लोक जाहीर रीतीने तिकीटावर उभे राहिले. स्वतंत्र मजूर पक्षात कायस्थ, मराठे वगैरे जातींचा समावेश आहे. ही गोष्ट हिंदुस्थानाच्या इतिहासात अपूर्व आहे. राजकारणातील आपली प्रगती ब्रह्मदेव जरी आड आला तरी थांबवू शकणार नाही. (टाळ्या)
हा नदी नाला नाही, पण सिंधू नदी आहे. धरण बांधले तरी फूटून जाईल. राजकारणातील हक्क मिळवून घेण्यास अडचण पडणार नाही. १५ माणसांनी काय केले ? काहीही झाले तरी ते आजच सांगणे कठीण आहे. आज २००० वर्षांपासून रुढी मानगुटीवर बसली आहे. तिला समूळ नाहीशी करण्यास १०-१२ वर्षे देणे अन्यायाचे होईल. राजकारणात ऐक्य व संघटना जितकी जास्त तितकी लवकर प्रगती होते. या बाबतीत आपल्या समाजाविषयी मला अभिमान वाटतो. इलेक्शनच्या वेळी जो प्रामाणिकपणा, धैर्य व संघटन दाखविले त्याच्या इतका प्रामाणिकपणा, धैर्य व संघटन या प्रांतामध्ये इतर कोणत्याही जातीने दाखविले नाही. आपण दारिद्रयाने व्यापलेले, दुःखाने गांजलेले आहोत, याचा विचार तुम्ही त्यावेळी केला नाही. ज्याचे पोट उपाशी मरते. मारवाडी देईल ते खाईल, अशी ज्यांची स्थिती आहे त्या तुम्ही दाखविलेला प्रभाव प्रशंसनीय आहे. तुम्ही आम्ही खेड्यापाड्यांमध्ये विखरुन राहिललो आहोत. आपली खेड्यात फक्त पाच-पंचविस घरे, इतरांची १०० च्या वरती घरे आहेत. अमुक एक करा नाहीतर तुमची वस्ती हाकलून देऊ असे जर त्यांनी ठरविले तर ते सहज करु शकतील, अशी तुमची स्थिती होती.
आपल्या माणसांनी स्वतंत्र मजूर पक्ष बलवान केला पाहिजे. त्यांच्या सांगण्याच्या विरुद्ध काहीही जाता कामा नये. त्यात समाजाच्या हिताच्या दृष्टीने तुमचाच फायदा आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की, काँग्रेसचे अध्वर्यू श्री. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या शिस्तीचे असे वर्णन केले आहे, ‘संघटना असावी तर डॉ. आंबेडकरांच्या संघटनेसारखी !’ (टाळ्या) तुम्ही या संघटनेमध्ये बिघाड होवू देवू नका. हंडाभर दूध नुसत्या मिठाच्या खड्याने नासते. पुष्कळसे अमृत विषाच्या नुसत्या थेंबाने बिघडते. त्याच प्रमाणे स्वार्थी, दुर्गुणी लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रवृत्त असतात. त्यांची स्वार्थाकडे विचारसरणी असते. अशी माणसे निर्माण होतील, हाच काळ कायम राहील, असे वाटत नाही. धान्य निवडताना खडा आपण फेकून टाकतो त्याचप्रमाणे कंटक, स्वार्थी माणसाला खड्यासारखे निवडून टाकले पाहिजे. (टाळ्या) महार जातीत तरी कोणताही मनुष्य स्वतंत्र मजूर पक्षाच्या विरुद्ध निर्माण होवू नये. राजकारणात संघटन व संघशक्ती केल्याखेरीज काही एक साधता यावयाचे नाही. संघशक्ती निर्माण करण्याकरिता पैसा पाहिजे. घरामध्ये संसाराला पैसा लागतो. मीठ, मिरचीसाठी पैसा लागतो. काँग्रेसजवळ राजकारण खेळण्यासाठी पैसा आहे. मला असे कळले की नुकत्याच झालेल्या डिस्ट्रीक लोकल इलेक्शनमध्ये एका काँग्रेसच्या उमेदवाराने तीन हजार रुपये खर्च करुन यश मिळविले. पैशांशिवाय राजकारणाचा गाडा हाकता येत नाही. दुसऱ्याच्या अंकित न राहता स्वतःच्या पायावर आपण उभे राहण्यास शिकलो पाहिजे. यावेळी मी आपणाला महाभारतातील एका गोष्टीची आठवण देतो. भीष्म आणि द्रोण कौरवांच्या बाजूला होते. कौरवांची बाजू खोटी व पांडवांची बाजू खरी. असे त्यांना माहित होते. ‘राज्यच काय पण सुईच्या अग्रावर मावेल इतकी मातीही पण मिळनार नाही.’ असे कौरवांनी पांडवांना सांगितले होते. खरी खोटी बाजू न जाणता भीष्म आणि द्रोण कौरवांच्या बाजूने लढले. सत्याने युक्त अशा पांडवांच्या बाजूने का लढले नाहीत. असे विचारले असताना ‘आम्ही कौरवांचे अन्न खातो’ म्हणून सांगितले.
जो दुसऱ्याच्या मदतीवर जगतो अगर जिवंत राहतो तो दुसऱ्याचा गुलाम अगर अंकित झाल्याशिवाय राहणार नाही. मी काँग्रेसच्या हरिजन सेवक संघाचा फंड घेतला नाही. त्यांचे ८-१० लाख रुपये घेतले असते तर मी त्यांचा गुलाम म्हणून राहिलो असतो व मला तुमच्याकरता काही करता आले नसते. त्यांच्या हजारो रुपयांपेक्षा तुमची पावली मला लाखाची आहे. (टाळ्या) तुमचा संसार तुम्ही स्वतःच्या शिरावर घ्या. त्यात तुमचाच फायदा आहे. आपणास काँग्रेसचा पैसा नको. काँग्रेसचे प्रचारक दरमहा ३०-४० रुपये घेवून काम करतात. आपले सेवक नुसते दरमहा १० रुपये घेवून काम करण्यास तयार होतील. स्वतंत्र मजूर पक्ष तुमचा आहे. त्यास तुम्ही मजबूत केले पाहिजे.
मी २० वर्षांचा असताना बी.ए. झालो. मला दोन हजारावर पगार सांगून आले आहेत. माझ्या बरोबरीचे मुलगे डिस्ट्रीक्ट जज्ज आहेत. यात मला काय फायदा आहे मोटारीतून हिंडतो, बॅरिस्टर म्हणून कोणता लाभ आहे? तुम्ही पडला गरीब! तुमच्या तक्रारी थोड्याच माझ्याकडे येणार आहेत. तंटे स्पृश्य वर्गाचे, तेच धनवान लोक! मला पैसा मिळण्याचा संभवहीं त्याच लोकांकडून आहे. पण मी तुमच्या फायद्यासाठी त्यांच्याशी झगडतो. म्हणून त्यांना माझी भीती वाटते.
माझ्या पश्चात कोण माणसे किती जबाबदारीने काम करु शकतील व माझी जबाबदारी कोण घेईल ? मला आशा आहे की काही जबाबदार तरुण निपजतील व ही जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतील. नाहीतर चढाणीवर चढलेली गाडी डोंगराच्या माथ्यावर गेल्यानंतर बैलाच्या अभावी घसरून पडते तशी स्थिती होईल, याबद्दल मला मोठी भीती आहे. आज आपण पर्वताच्या उत्तरणीवर आहोत. चढण चढू लागलो आहोत. आपला अंतिम हेतू अद्याप साधला नाही. यात्रेसाठी निघालो आहोत परंतु अजून देवाला पाहिले नाही, यात्रा संपेपर्यंत आपण सर्वांनी पीठ, मीठ वगैरे सामुग्री बरोबर घेऊन चालावयास पाहिजे. आज राजकारणाची भीती वाटत नाही. परंतु राजकारणाच्या धुळवडीमध्ये जो प्रश्न आम्ही हाती घ्यावयास पाहिजे तो प्रश्न मागे राहिला आहे. आपल्या स्वतःच्या दुष्कृत्यामुळे आपणास जनावराचीही किंमत नाही. कारण तुम्ही गावातील तुकडे मागून खाता व मेलेल्या जनावरांचे मांस फाडून खाता. आज राजकारण लढविले तरी त्याचा काय उपयोग ? देऊळ बाहेरुन मढविले तर त्याची काय सोभा ? तुम्ही मृत्तमांस खाणे सोडून दिले तर कोण खाईल ? ते मेलेले जनावर गिधाड व कुत्रा खाईल? यात तुमची काय किंमत आहे ? त्याची तुम्हास लाज कशी नाही ? समजा उद्या जाधव मुख्यप्रधान झाला ही काही अशक्य कोटीतली गोष्ट आहे असे नव्हे, तर त्याला स्पृश्य लोक मान देतील काय ? सध्याप्रमाणे ते आरती ओवाळतील काय ? जे जीवन तुम्ही आज व्यतीत करीत आहात ते जीवन तुम्ही बंद केले पाहिजे व स्वच्छतेने नीटनेटके राहावयास पाहिजे.
तुम्ही जर आमचे मृत मांस व तुकडे खाण्याचे बंद करता तर मग आम्ही काय खाणार ? असा प्रश्न काही लोक विचारतात, त्यांना मला असे सांगावयाचे आहे की, समजा या जवळ असलेल्या चितोड गावच्या दोन मुली ते गाव सोडून मुंबईला गेल्या, त्यापैकी एकीने सांसाराला फाटा दिला व वेश्येचा धंदा पत्करला. तिला घडीचा पलंग तक्या, गाद्या, खुर्च्या, टेबल वगैरे आहे. एक नोकर आहे. इराण्याच्या दुकानावरून ती मस्कास्लाईस, खिमा, रोटी माडीवरुन मागविते. दिवसातून चार पितांबर नेसते. पावडर लावते. किती सुबक जीवन नाही ? दुसरी मुलगी ७ रुपये पगारावर काबाडकष्ट करते. नवऱ्याला एक किंवा दीड रुपया मिळेल त्याच्यावर गुजराण करते, कथलाच्या गोटाशिवाय तिच्याजवळ दुसरा दागिना नाही. मीठ भाकरी खाऊन कैक वेळा उपाशीही राहते. तेव्हा या दोन मुलींपैकी तुम्ही कोणत्या मुलीला मान द्याल ? देह विक्रय करुन पितांबर नेसते तिला की जी गरीबीने, दुःखाने गांजलेली व अन्नाला मौताज झाली तिला ? मला वाटते सर्व न्यायी माणसे पतिव्रता स्त्रीलाच मान देतील. तेव्हा तुमची पोटाची खळगी भरो न भरो तुम्ही चांगल्या रीतीनेच वागावयास पाहिजे. स्वाभिमान, धैर्य, नीती काही आहे किंवा नाही ?
आम्ही जे करतो ते बरे, वाईट, न्याय, इभ्रत याच्याकडे लक्ष देवून आपण करतो किंवा नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही येथून सभेतून गेल्यावर नवीन कार्यक्रमास सुरवात करावी. (स्त्रियांस उद्देशून) इत्तर स्त्रियांप्रमाणे तुम्हीही आणि तुमची मुले गुराखी आहेत याचे कारण तुम्ही नरकात गुंतला आहात. आम्ही तुमचे दूध पिऊन वाढलो आहोत. इतर स्त्रियांची मुले मामलेदार, हायकोर्ट जज्ज आहेत. हे तुमचे पाप आहे. तुमचे वर्तन असेच अशुद्ध राहिले तर तुमची मुले अशीच राहतील. ‘नर करनी करे तो नर का नारायण बने.’ इतर स्त्रिया काही देवावतार नाहीत. त्याही स्त्रियाच आहेत, त्यांना वाव आहे. तुम्हाला वाव नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी स्वाभिमानाने व धैर्याने वागावयास शिका. आपले अंतिम ध्येय गाठण्यासाठी कसोशीने
प्रयत्न करा.”
असे उपदेशपर दीड तास डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर श्री. पुनाजीराव लळिंगकर यांनी सर्वांचे आभार मानले. डॉ बाबासाहेब आंबेडकर की जय! अशा गजरात सभा बरखास्त झाली.
आनंद सैंदाणे,
संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन समिती, धुळे
हेही वाचा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धुळे येथील ऐतिहासिक भेट : Article 1
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेली वाघाडी ता. शिरपूर येथील बैलपोळ्याची केस Article 2
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धुळे भेट : एक वास्तव’
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्यायालयीन कामकाजानिमित्त 31 जुलै 1937 आणि 17, 18, 19 जून 1938 रोजी धुळ्यात आले होते. आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व आनंद सैंदाणे यांनी बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धुळे भेटीचे दस्तावेज संकलित केले. बाबासाहेबांनी खान्देशात विविध ठिकाणी भेट देत समाजप्रबोधन करण्याचा संदेश आपल्या अनुयायांना दिल्याचे पुरावेही त्यांना मिळाले. बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक कार्याच्या आठवणींना कायमस्वरूपी उजाळा मिळत राहिला तर आंबेडकरी चळवळ बळकट होण्यास मदतच होईल, हे ओळखून बाबासाहेबांनी ज्या ट्रॅव्हलर्स बंगल्यात मुक्काम केला होता, त्या बंगल्याला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आनंद सैंदाणे यांनी या ऐतिहासिक बंगल्याला ‘संदेश भूमी’ असे नाव दिले. तसेच संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन समितीची स्थापनाही केली. संदेश भूमी येथे बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा आणि ग्रंथालय उभारून याठिकाणी शिक्षण तसेच प्रबोधनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. महाराष्ट्रातील खान्देश आणि विशेष करून धुळे शहराशी बाबासाहेबांचा असलेला वारसा जगाला माहित व्हावा याकरिता आनंद सैंदाणे यांनी एक पुस्तकही लिहिले आहे. संदेश भूमी राष्ट्रीय स्मारकाच्या चळवळीत खारीचा वाटा म्हणून आम्ही,आनंद जयराम सैंदाणे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक धुळे भेट : एक वास्तव’ या पुस्तकाची लेखमाला प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या लेखमालेचा पहिला भाग रविवार दि. 21 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध होत आहे. आपण या लेखमालेला भरभरून प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा..!
– संपादक/संचालक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे
आनंद सैंदाणे (अध्यक्ष)
दीपक नगराळे (उपाध्यक्ष)
रवींद्र शिंदे (सचिव)
विजय भामरे (सहसचिव)
विजय सूर्यवंशी (कोषाध्यक्ष)
सदस्य : विजयराव मोरे, बाळासाहेब अहिरे, नाना साळवे, चंद्रगुप्त खैरनार, शरद वेंदे, चंद्रभान लोंढे, अमित सोनवणे, विद्रोही थोरात, आनंदा सोनवणे