सशस्त्र दरोडेखोरांची टोळी एलसीबीच्या जाळ्यात
धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्गावरील दरोड्याचा डाव उधळून लावला. चौघे पसार झाले तर विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळाहून गावठी कट्टयासह दरोड्यांचे साहित्य व कार असा सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बालकाने त्यांच्या साथीदारांसह चोरीची कबुली दिली. एकुण दहा गुन्ह्याची उकल करण्यास एलसीबीला यश आले आहे.
मोहाडी पोलीस ठाणे हद्दीतील गरताड बारीमध्ये एक संशयीत कारसह ५ जण उभे असल्याची खात्रीशीर माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पथकाला रवाना केले. पथक गरताड बारीमध्ये दाखल होताच एम.एच. १५ बी.डी. ५८३१ क्रमांकाची कार सोडून तेथे उभे चौघे जंगलात अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. पथकाने कारची तपासणी केली असता त्यात एक विधी संघर्षीत बालक आढळून आला. त्याने मोहाडीतील दंडेवाला बाबा नगरात राहत असल्याचे सांगितले. तसेच कारमध्ये चोरी, घरफोडी व दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य मिळुन आले. त्यात मिरचीची पुड, ८ लिटर पेट्रोल असलेली कॅन, गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, २ कटर, २ स्क्रू ड्रायव्हर, २ लोखंडी टॅमी, कात्रीचे दोन भागात विभाजन केलेले ६ नग व एक लाखाची कार असा एकुण १ लाख ३४ हजार १० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. विधी संघर्षीत बालकाने यापुर्वी केलेल्या गुन्हयांच्या हकीगतीसह पळुन गेलेल्या त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. त्यात वरुणसिंग टाक (रा. दाहोद, गुजरात), मुकूंदर जुनी (रा. नदीजवळ, नंदुरबार), आकाश मांग (रा.नदी जवळ, नंदुरबार), वरुणसिंग टाक याचा मित्र असे सांगुन यांचे सोबत गुन्हे करीत असल्याचे सांगितले. आणखी चौकशीत त्याने वरील साथीदारांसह दि. ३१ जानेवारी रोजी कोळगाव ता.भडगाव येथुन वॅगनर कार चोरी केल्याचे सांगितले. ही कार घेवुन गोंडगाव येथे दि.१ व २ फेब्रुवारी रोजी दरम्यान रात्री मेडीकल दुकानातुन रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. ही चोरी करुन कारने जात असतांना भऊर (ता. चाळीसगाव) गावाजवळ कारचे पेट्रोल संपल्याने कार तेथेच सोडुन बहाळ गावातून अल्टो कार चोरी केल्याचे सांगितले. तसेच त्याने व इतर साथीदारांनी आँक्टो २०२३ मध्ये साक्री तालुक्यातील कावठी गावात, डिसेंबर २०२३ मध्ये साक्री तालुक्यातील दिघावे गावात, धुळे शहरातील बुशरा कॉलनीत व जानेवारी २०२४ मध्ये अनुक्रमे कासारे, छडवेल पखरुण व किरवाडे गावात चोर्या केल्याची कबुली दिली.
दरम्यान, दि. ४ फेबु्रवारी रोजी मध्यरात्री विधी संघर्षीत बालक व त्याचे वरील साथीदारांसह कजगाव (ता. भडगाव जि.जळगाव) येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने बहाळ येथुन चोरी केलेल्या अल्टो कारने दरोडा टाकण्यासाठी उपयोगी येणार्या वरील साहीत्यासह गरताडबारीमध्ये मिळुन आल्याने बालकासह वरील पाच जणांवर मोहाडी पोलिसात भादंवि कलम ३९९, ३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहा गुन्ह्याची उकल : विधी संघर्षात बालक याने त्याच्या वरील साथीदारांसह चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याबाबत एलसीबीने खात्री केली. त्यात दहा गुन्ह्यात उकल झाली झाली असून मेहुणबारे पोलिस ठाण्यात दाखल एमएच १५ बीडी ५८३१ क्रमांकाच्या अल्टो कार चोरीचा गुन्हा, पारोळा पोलिसात दाखल एमएच १८ सीसी ७६५३ क्रमांकाच्या दुचाकी चोरी, भडगाव पोलिसात दाखल एमएच १९ एई ४९२६ क्रमांकाची वॅगनर कार चोरी, साक्री पोलिसात दाखल पाच घरफोडीचे गुन्हे, चाळीसगाव रोड पोलिसात दाखल घरफोडी या दहा गुन्ह्याची पोलिसांनी उकल केली आहे.
या पथकाची कामगिरी : ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, असई संजय पाटील, शाम निकम, दिलीप खोंडे, पोहेकॉ मच्छिद्र पाटील, संदीप पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संतोष हिरे, संदीप पाटील, प्रल्हाद वाघ, अशोक पाटील, प्रकाश सोनार, तुषार सुर्यवंशी, देवेंद्र ठाकुर, योगेश साळवे, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी, नितिन मोहणे, जगदीश सुर्यवंशी, सुशिल शेंडे, कमलेश सुर्यवंशी, निलेश पोतदार, राजीव गिते, कैलास महाजन यांच्या पथकाने केली.