तोतया जीएसटी अधिकारी प्रकरणात परराज्यातील टोळीला अटक होण्याची शक्यता
धुळे : तोतया जीएसटी अधिकारी बनून महामार्गावर मालवाहू ट्रक अडवून व्यापारी फसवणूक प्रकरणात परराज्यातील टोळीला आज अटक होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात दोन दिवसांपुर्वीच अटक केलेल्या सराईत गुन्हेगार बबल्या यांच्या खात्यात देखील ७१ लाखांची रक्कम अचानक आली असून याप्रकरणात फसवणूकीची रक्कम १ कोटी ४६ लाखावर गेली असून ही रक्कम दुप्पट होणार असल्याची माहिती आज पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात महामार्गावर जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत पटीयालातील व्यापार्यांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणाचा पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने छडा लावला. याप्रकरणात पोलिस पथकाने निजामपूर येथील एएसआय बिपीन पाटील, मोहाडी पोलीस ठाण्याचा कर्मचारी इम्रान शेख यांच्यासह नाशिक येथून स्वाती पाटील यांना या आधीच अटक केली आहे. तिघे सध्या पोलिस कोठडीत असून याप्रकरणात दोन दिवसांपुर्वीच विनय सुरेश बागुल उर्फ बबल्या याला देखील जेरबंद केले. चौकीशत त्यांच्या बँक खात्यात देखील अचानक ७१ लाखांची रक्कम असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत त्यास बँकेने देखील विचारणा केली होती. तसेच तपासात आणखी चार जण समोर आले असून त्यांनी आमच्या नावाने अकाऊंट ओपन केल्याचे त्यांनी सांगितले. तर या प्रकरणात आज परप्रांतीय टोळीला देखील अटक होण्याची शक्यता आहे. तसेच स्वाती पाटील ही बँकेची रिजनल हेड होती. त्यामुळे याप्रकरणात फसवणूकीची रक्कम दोन कोटीवर जाण्याचीही शक्यता पोलिस अधिक्षकांनी व्यक्त केली आहे.