टोकरे कोळी आरक्षण आंदोलनाला पत्रकारांचा पाठिंबा
धुळे : कोळी समाजाला जातीची प्रमाणपत्रे मिळावी म्हणून प्रशासनाशी संघर्ष करणाऱ्या व दारूबंदीसाठी लढा उभारणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी गेल्या दहा दिवसांपासून धुळे शहरातील क्युमाईन क्लबसमोर आमरण उपोषण चालविले आहे. या उपोषणाला धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे रविवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी पाठिंबा जाहीर करण्यात आला.
याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, कार्यकारिणी सदस्य प्रा. मोहन मोरे, माजी कार्यकारिणी सदस्य सुनील बैसाणे उपस्थित होते. दरम्यान याअगोदरही गीतांजली कोळी यांनी कोळी समाजाला जातीचे दाखले मिळावेत तसेच दारूबंदीच्या विषयावर अनेक आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात त्यांनी गेटवर आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.
परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होत. त्यांच्या आमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी प्रशासनाने त्यांना कोळी समाजाला जातीचे दाखले देण्यासंदर्भात आश्वासक लेखी पत्र दिले. यामुळे अर्धी लढाई आपण जिंकलो असल्याची भावना गीतांजली कोळी यांनी व्यक्त केली.