विनोद वाईन शॉप हटाओ आंदोलनाला पत्रकारांचा पाठिंबा
धुळे : शहरातील विनोद वाईन शॉप हटविण्याच्या मागणीसाठी अखेर आजाद समाज पार्टीचे राज्य अध्यक्ष आनंद लोंढे यांनी निवेदने, मोर्चे, चर्चा, स्मरणपत्रे, तोडफोड, आत्मदहनाचा इशारा, प्रजासत्ताकदिनी पोलिसांनी केलेली अटक या सर्व संघर्षानंतर गुरुवार दिनांक १ फेब्रुवारी रोजी धुळे शहरातील क्युमाईन क्लबसमोर आमरण उपोषण सुरु केलंय.
त्यांच्याबरोबर आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आबा अमृतसागर, शहराध्यक्ष भैय्या वाघ, किरण भालेराव, दावल वाघ, मुकेश वाघ, चिंतामण थोरात हे देखील आमरण उपोषणाला बसले आहेत. या उपोषणाला आंबेडकरी, दलित पक्ष, संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जाहीर पाठिंबा देत आनंद लोंढे यांच्या लढ्यास बळ मिळवून दिले आहे. रविवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी या उपोषणाचा ४ था दिवस होता. या दिवशी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघानेही आनंद लोंढे यांच्या उपोषण आन्दोलनाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला.
याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, सचिव सचिन बागुल, माजी अध्यक्ष रवींद्र इंगळे, चंद्रशेखर पाटील, कार्यकारिणी सदस्य प्रा. मोहन मोरे, माजी कार्यकारिणी सदस्य सुनील बैसाणे यांनी पाठिंब्याचे लेखी पत्र आनंद लोंढे यांना दिले. विनोद वाईन शॉप हटविण्याचा लढा आता निर्णायक होईल अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे.
दरम्यान, चौथ्या दिवशीही उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात आनंद लोंढेंसह उपोषणार्थींचे वजन कमी झाले असल्याचे तसेच प्रकृतीही खालावत असल्याचे दिसून आले. रक्ताचेही नमुने वैद्यकीय यंत्रणेने घेतले आहेत. उपोषणकर्त्यांची शारीरिक अवस्था पाहता प्रशासनाने उपोषण थांबविण्यासाठी टाकलं पावले उचलणे गरजेचे आहे.