राणी चेन्नम्माचा प्रेरक वारसा पुढे नेण्यासाठी महिलांची देशव्यापी मोहीम
धुळे : 21 फेब्रुवारी रोजी कर्नाटक राज्यातील कित्तूर येथे राणी चेन्नम्मा यांच्या प्रेरणादायी लढ्याच्या स्मरणार्थ दिवसभर कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कर्नाटकातील धारवाढ येथून कित्तूरपर्यंत १० दिवस यात्रा करीत महिलांसह सहभागी होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या नाजनीन शेख यांनी ४ फेब्रुवारी रोजी पत्रकार भवनात झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
राणी चेन्नम्मा यांच्याविषयी माहिती देताना नाजनीन शेख यांनी सांगितले की, राणी चेन्नम्मा यांनी सन 1824 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात सशस्त्र प्रतिकार करून आपले स्वातंत्र्य राखण्यासाठी लढा उभा केला. ब्रिटीश वसाहतवादाच्या विरोधात, कित्तूर सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या आणि काही महिला शासकांपैकी एक म्हणून राणी चेन्नम्मा, कर्नाटकातील लोकनायक म्हणून कायम लक्षात ठेवली जाते, ती भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. कित्तूर राणी चेन्नम्मा ही भारतातील ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंडाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिलांपैकी एक होती.
ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढणारी एक निर्भय योद्धाम्हणून आणि, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाच्या प्रेमाला मूर्त रूप देणार्या प्रतिकाराचे प्रतीक म्हणून तिचे स्थान अत्युच्च आहे. 2024 हे वर्ष राणी चेन्न्म्माच्या ब्रिटीश साम्राज्यवादाविरुद्धच्या लढ्याचे 200वे वर्ष आहे. हे वर्ष साजरे करण्यासाठी अनहद,आणि NFIW यांनी पुढाकार घेतला आहे. कर्नाटक राज्य महिला दुर्जन्य विरोधी ओक्कुटासोबत समन्वय करून कित्तूर व देशभर हे वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. दडपशाहीविरुद्धच्या या बंडाच्या 200 वर्षांच्या स्मरणार्थ आणि राज्यघटना, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांच्या रक्षणासाठी अत्याचार, अन्याय आणि दडपशाहीविरुद्धच्या संघर्षाचा वारसा पुढे नेण्यासाठी अल्पावधीतच या मोहिमेत देशभरातून मोठ्या संख्येने महिला संघटना आणि नागरिक सामील झाले आहेत. दि 21 फेब्रुवारी रोजी कित्तूर येथे राणी चेन्नम्मा यांच्या प्रेरणादायी लढ्याच्या स्मरणार्थ दिवसभर कार्यक्रम होणार आहेत.
कित्तूर येथील सभा आणि दिवसभराच्या कार्यक्रमात भारतभरातील प्रमुख महिला कार्यकर्त्या सहभागी होणार आहेत. यासाठी धुळे येथील डॉ बाबा साहेब आंबेडकर सेवा भावी संस्था व राष्ट्र सेवा दल, सर्वोदय धुळे, हरिजन सेवक संघ धुळे, यांनी पुढाकार घेतला असून ज्येष्ठ पत्रकार रमेश दाणे, सामाजिक कार्यकर्त्या नाजनीन शेख, मधुकर शिरसाट, हरिजन सेवक संघ, प्रा. झीनत मॅडम कॉम्रेड एल. आर. राव प्रयत्नशील आहेत अशी माहिती नांजनीन शेख यांनी दिले.