आंनंदखेडे गावात तरुणीचा विनयभंग करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
धुळे : तालुक्यातील आंनंदखेडे गावात तरुणीचा विनयभंग करणाऱ्यांना त्वरीत अटक करावी, पीडित तरुणीसह तिचे नातेवाईक आणि मदतीसाठी धावून आलेल्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी पीडित तरुणीने पोलिसांकडे केली. याबाबत सोमवारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीला तिच्याच गावात राहणाऱ्या गणेश अशोक अमृतसागर याने विनयभंग केला. तो तिला सतत शाळेत येता-जाता त्रास देत असे. २८ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पीडित तरुणी तिच्या बहिणीसोबत सार्वजनिक शौचालयात गेली असता गणेश अमृतसागर याने महिला शौचालयामध्ये अश्लिल चाळे केले. तसेच बदनामी करण्याची दमदाटी केली. कशीबशी सुटका करून घरी जात असताना रस्त्यात तिच्या काकांना घडलेला प्रकार सांगितला. याबाबत काकांनी त्या तरूणाला जाब विचारला असता गणेश अमृतसागरचे वडील अशोक सोनु अमृतसागर यांनी शिवीगाळ केली. तरूणीबद्दलही अश्लिल भाषेत बोलला. त्याचवेळी गणेश अशोक अमृतसागर याने हातात लाकडी दंडा घेवुन पीडित तरुणीच्या काकांना मारहाण केली. त्याच्या वडीलांनी लोखंडी सळईने मारहाण केली.
त्यानंतर धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे गेले असता पोलिसांनी रूग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. कानाला सात टाके द्यावे लागले. त्यानंतर पोलीस ठाण्यात गेले असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु आरोपींना अद्याप अटक केली नाही.
याउलट पीडित तरुणीसह घटनास्थळी नसलेले पीडित तरूणीचे वडील, मदतीसाठी धावून आलेले सामाजिक कार्यकर्ते सतिष अमृतसागर, वकील आणि जखमी झालेल्या व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून खोटे गुन्हे मागे घ्यावेत, विनयभंग करीत मारहाण करणाऱ्यांना त्वरीत अटक करावी, अशी मागणी पीडित तरुणीने निवेदनात केली आहे.