विनोद वाईन्सचा कायमस्वरूपी निकाल लावण्यासाठी गुरुवारी मंत्रालयात बैठक
धुळे : शहरातील मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी आझाद समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या ७ दिवसांपासून आनंद लोंढे, भैय्यासाहेब वाघ आणि कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. आ. फारुख शाह यांनी उपोषणकर्ते कार्यकर्त्यांची भेट घेवून मंत्रालयात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक आयोजित करणेबाबत आश्वासन दिले होते. त्यानुसार ८ फेब्रुवारी रोजी ११.१५ वा. मंत्री महोदयांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
आझाद समाज पार्टीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून धुळे शहरातील मध्यवर्ती भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या मागे असलेले विनोद वाईन्स हे विदेशी मद्याचे दुकान हटवावे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. दि. १ फेब्रुवारीपासून आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे. दि. ३ फेब्रुवारी रोजी उपोषणस्थळी आ. फारुख शाह यांनी भेट देवून उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला होता आणि आंबेडकरी जनतेच्या भावनेशी खेळणाऱ्या विनोद वाईन्सचा कायमचा निकाल लावण्यासंदर्भात मंत्रालयीन पातळीवर प्रयत्न करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात ना. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री महोदयांच्या मंत्रालयीन दालन क्र. ३०२, मुख्य इमारत, ३ रा मजला येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस आ. फारुख शाह, जिल्हाधिकारी धुळे, (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग), पोलीस अधिक्षक (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग), धुळे, आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित राहणार. उपोषणकर्ते आझाद समाज पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांना देखील या बैठकीस निमंत्रित केले आहे. बैठकीच्या निमंत्रण पत्र शहेबाज शाह यांचे हस्ते आनंद लोंढे यांना देण्यात आले. यावेळी मुकुंद शिरसाठ, राज चव्हाण, रवी नगराळे, सतिष अमृत्सागर, संजय अहिरे, भैय्यासाहेब वाघ, किरण भालेराव, दावल वाघ, चिंतामण थोरात, मुकेश वाघ आदी उपस्थित होते.